संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळेमिळीत संपन्न
बांदा : प्रतिनिधी
डिंगणे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, डिंगणे या संस्थेच्या चेअरमनपदी प्रमोद मधुकर कामत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सोमवारी डोंगरपाल हायस्कूलच्या सभागृहात संपन्न झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत २०२५- ३० या पाच वर्षासाठीच्या नूतन कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली.
डिंगणे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, डिंगणे या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न झाली. या सभेत २०२५- ३० या कालावधीसाठी संस्थेची नूतन कार्यकारणी निवड करण्यात आली. संस्थेच्या अध्यक्षपदी प्रमोद कामत, उपाध्यक्ष रोहित नाडकर्णी व विलास सावंत, सचिव नारायण सावंत, खजिनदार लाडू गवस व सहसचिव पदी रामदास नाईक यांची एकमताने निवड करण्यात आली.

सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. प्रशालेत मुलांची पटसंख्या वाढावी या दृष्टीने प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले. प्रशालेत बाह्य शिक्षक मानधन खर्च, मुलांना प्रशालेत येण्यासाठी बस सुविधा लोक वर्गणीतून करण्याचे निश्चित करण्यात आले. तसेच प्रशाला रंगरंगोटी, सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे ठरविण्यात आले.
संस्थेच्या मागील जमा खर्चास सभेने मान्यता दिली. सदर सभा खेळीमिरीत संपन्न झाली. यावेळी प्रमोद कामत यांनी संस्थेच्या सभासदांनी आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविणार. पालकमंत्री ना. नितेश राणे, खा. नारायण राणे, आ. दीपक केसरकर यांच्या माध्यमातून प्रशालेसाठी विकास निधी, साधनसामग्री वाढवण्याकडे आपला कल राहील, असे स्पष्ट केले. प्रमोद कामत यांनी उपस्थितांचे आभार मानले.











