सोनुर्ली श्री देवी माऊलीच्या चरणी भक्तीचे लोटांगण 

सावंतवाडी । प्रतिनिधी : दक्षिण कोकणचे प्रतिपंढरपूर असलेल्या सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीच्या चरणी हजारो पुरुष आणि महिला भाविकांनी लोटांगण घालून आपला नवस फेड केला. गुरुवारी रात्री देवीच्या प्रांगणात झालेल्या जत्रोत्सवातील हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी भाविकांचा जनसागर उसळला होता. तर आज शुक्रवारी सकाळी तुलाभार आणि देवीच्या कौलाने जत्रोत्सवाची उत्साहात सांगता झाली.

सोनुर्ली श्री देवी माऊलीचा दोन दिवस चालणाऱ्या लोटांगणाच्या जत्रोत्सवाला गुरुवारी रात्री दरवर्षीप्रमाणे तुफान गर्दी उसळली. दिवसभर असलेली तुरळक गर्दी रात्री आठ वाजल्यानंतर भाविकांच्या जनसागरात रूपांतरित झाली. मंदिराकडे जाणारे रस्ते आणि परिसर भक्तांच्या गर्दीने फुलून गेले होते.

*नवस फेडण्यासाठी लोटांगणाचा सोहळा*

रात्री ठीक साडेदहा वाजता देवीची पालखी कुळघराकडून वाजत-गाजत, फटाक्यांच्या आतषबाजीत मंदिरात दाखल झाली. यानंतर विधीवत प्रथेप्रमाणे रात्री अकरा वाजता लोटांगणाच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. तत्पूर्वी, भाविक भक्तांना देवीचे दर्शन आणि ओटी भरण्याचे काम अविरत सुरू होते. पालखी मंदिरात आल्यानंतर हा कार्यक्रम थांबवण्यात आला.

मंदिराच्या सभामंडपाच्या पायरीपासून लोटांगणाला सुरुवात झाली. पुरुष नवसकरी भक्तांनी जमिनीवरून लोटांगणे घातली, तर महिलांनी उभे चालत लोटांगणे घातली. संपूर्ण मंदिराला एक प्रदक्षिणा पूर्ण करून हे लोटांगण त्याच पायरीपर्यंत येऊन पूर्ण केले जाते. यावर्षीही हजारो महिला-पुरुषांनी लोटांगण घालून आपला नवस फेडला. महिला भाविकांची संख्या लक्षणीय होती. लोटांगणाचा कार्यक्रम सुरू होताच श्री देवी माऊलीच्या अवसारांनी (संचार) तरंगकिठीसह भक्तांना दर्शन दिले. सुमारे दोन तासांहून अधिक काळ पुरुष भक्तांची लोटांगणे चालली, त्यानंतर महिलांची लोटांगणे झाली. हजाराहून अधिक महिला आणि पुरुष भाविकांनी देवी चरणी लोटांगण अर्पण केले.

*देवस्थानकडून खास सुविधा*

नवसकरी भाविक भक्तांना लोटांगण घालताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी अनेक हात मदतीसाठी पुढे सरसावले होते. देवस्थान कमिटीकडून यावर्षी लोटांगण घालणाऱ्या महिला-पुरुषांसाठी नव्याने उभारलेल्या इमारतीत आंघोळीसाठी खास व्यवस्था करण्यात आली होती.

लोटांगणाचा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणेने खास नियोजन केले होते. खुद्द पोलीस अधीक्षकांनी जत्रोत्सवाला हजेरी लावत बंदोबस्ताची माहिती घेतली. संपूर्ण जत्रोत्सव पार पडेपर्यंत सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण हे जातीनिशी सर्व हालचालींवर लक्ष ठेवून होते.

*तुलाभार आणि कौलाने सांगता*

जत्रेचा दुसरा दिवस शुक्रवार हा गावातील गावकरी आणि केळीकुळ यांना देवीच्या दर्शनासाठी आणि ओटी भरण्यासाठी राखीव ठेवण्यात आला होता, त्यामुळे सकाळपासूनच मोठी गर्दी पाहायला मिळाली. याच दिवशी सुरू असलेल्या तुलाभार कार्यक्रमालाही मोठी गर्दी झाली होती. अडी-अडचणी असलेल्या भाविकांनी आपल्या वजनाएवढ्या वस्तू देऊन नवस फेड केला. हा कार्यक्रम उशिरापर्यंत सुरू होता. दुपारनंतर देवीच्या संचारी अवसाराने जत्रोत्सव पार पडल्याचा कौल दिल्यानंतर या भव्य जत्रोत्सवाची उत्साहात सांगता झाली.