वार्तापत्र -कोकण संतोष वायंगणकर : कोकणच्या किनारपट्टीला गेले काही दिवसांमध्ये मुसळधार पाऊस, वादळी पाऊस असं समिश्र वातावरण तयार झालं आहे. सहाजिकच याचा एक विचित्र परिणाम या आंबा बागायतींवर होत आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात सर्वसाधारणपणे मोहोर येतो. यावर्षी मोहोर आलाच नाही. थंडीही गायब आहे. आता जरी पाऊस थांबला तरीही भरपूर मोहोर येण्यास डिसेंबर महिना उजाडणार आहे. यामुळे सहाजिकच यावर्षीचा प्रथमचा आंबा बाजारात यायला मार्च महिना उजाडणार आहे. त्यामुळे कोकणातील हा हापूस आंबा देशभरातील बाजारात मोठ्याप्रमाणावर दिसायला निश्चितच एप्रिल-मे महिना उजाडण्याची शक्यता नाकारता येणार नाही…
महाराष्ट्रात पाऊस थांबायच नाव घेत नाही. कोकणातील भातशेतीवर या अतिवृष्टीचा परिणाम गावो-गावी झाला. यामुळे कोकणातील भातशेती पाण्याखाली गेली. गुरांना लागणारे गवतही मिळणे अवघड झाले आहे.पाणथळ भागात असणारी शेती पाण्याखालीच गेली आहे. यामुळे कोकणातील भातशेती करणारा शेतकरी, तसेच नाचणी आणि तृणधान्य करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे भातशेतीचे नुकसान झालेले असताना आंबा, काजू बागायतदारही चिंतेत आहेत. याचे कारण नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही पाऊस कोसळत आहे. आजही केव्हा आकाश भरून येईल आणि पाऊस कोसळेल ही टांगती तलवार शेतकऱ्याच्या डोक्यावर कायम आहे. सहाजिकच याचा परिणाम आंबा बागायतीवर होत आहे. आंबा बागायतीमध्ये पावसामुळे चिखल आहे. पाऊस कोसळत असल्याने नोव्हेंबरमध्ये येणारी थंडी अद्यापही सुरू झालेली नाही. जो काही भागामध्ये आंबा बागायतीत आंब्यांना मोहोर येतोय असे वाटत होते त्या भागातील आंबा बागायतीत आलेला थोडाफार मोहोरही पावसाने कुजला आहे. सतत जो पाऊस पडत आहे त्यामुळे आंबा, काजू, या फळबागायतींना पोषक वातावरण होणं आवश्यक असते असे वातावरणही तयार झालेले नाही. त्यामुळे त्याचा फटका आंबा बागायतदारांना बसणारा आहे.
आंबा बागायतदार पाऊस कधी जातोय आणि नोव्हेंबर डिसेंबरची कडाक्याची थंडी कधीपासून पडतेय त्या वातावरणाच्या प्रतिक्षेत आहेत. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात थंडीला सुरूवात होते अनेक आंबा बागायतीत कणीदार मोहोर आलेला असतो. कोकणातील आंबा. काजू बागायतदार शेतकरी आपल्या बागेतील झाडांचा मोहोर पाहून सुखावलेला असायचा. अगदी मार्च, एप्रिल, मे महिन्यात आंबा, काजू बागायतीतून चांगल उत्पन्न मिळेल अशा आशेवर तो असायचा. वर्षभराच्या खर्चाचे आडाखे तो मनात मांडायचा. परंतु यावर्षी मात्र कोकणातील हाच थंडी आणि मोहोरावर अंदाज बांधणारा शेतकरी काय होईल काहीच सांगता येणारे नाही. तो चिंतेत आहे. निसर्गाच्या लहरीपणाने नैसर्गिक बदलाने कोकणातील शेतकऱ्यांचे आर्थिकतेचे चक्रही कोलमडले आहे. कलिंगडाची बागायत शेती करणारा शेतकरीही काय करायच या चिंतेत आहे. सगळाच हंगाम लांबणार आहे. सुपारी बागायतदार देखिल निसर्गचक्रात बेजार झाला आहे. कोकणात जसा आंबा, काजू मोठ्याप्रमाणात होतो तसच सुपारी, नारळ बागायती क्षेत्रही मोठ आहे. रतांबा बागायती करणारे शेतकरी आहेत. गतवर्षी रतांब्याला चांगला दर आला होता. रतांबा बागायतदार आपल्याकडे कमी आहेत. पूर्वपार वडिलोपार्जित रतांबा लागवड करण्यात आली आहे. त्याच झाडांचे रतांबे आज होत आहेत काही अपवादात्मक ठिकाणी ज्यांना रतांबा बागायतीने चांगल उत्पादन घेता येईल असे वाटते त्यांच्याकडून रतांब्याची मोठ्याप्रमाणात लागवडही करण्यात आली आहे. परंतु रतांब्याला फारमोठी मेहनत आहे. रतांब्यापासून होणाऱ्या आमसूलला गतवर्षी फारमोठी मागणी होती. दरही खूप अधिक होता. परंतु रतांब्याच उत्पादनही फारच कमी राहिले आहे. शेवटी कितीही पैसे घ्या परंतु आमसूल द्या अशी मागणी असताना दामदुप्पट पैसे देऊनही आमसूल मिळत नव्हती. यामुळे कोकणात पिकणाऱ्या सर्वच फळांना मोठी मागणी असते.
आपल्या देशभरात जरी वेगवेगळया जातीचा आंबा तयार होत असला तरीही कोकणच्या हापूसला अगदी जागतिक स्तरावरही तोड नाही. कोकणातील हापूस आंबा स्वादिष्टपणाला सर्वत्र प्रसिद्ध आहे. कोकण म्हटल की देवगड, रत्नागिरी हापूस हे आपसूकच नाव जोडले जाते. कोकणातील हा आंबा वेळेत पावसाने विश्रांती घेतली भरपूर थंडी पडली, मोहोर वेळेवर आला तर साधारण फेब्रुवारीपासून आंबा बाजारात येतो. आणि जूनच्या पहिल्या, दुसऱ्या आठवड्यापर्यत हा आंब्याचा हंगाम सुरू रहातो. कधी-कधी सुरूवातीला आंब्याचा असणार दर नंतर मिळत नाही. काहीवेळा आंबा अचानकपणे बाजारात मोठ्याप्रमाणावर येऊ लागला की आंब्याचा दर कमी होतो. आंबा बागायतदार शेतकऱ्याच्या हे सर्व अंगवळवी पडलेल आहे. काय घडू शकते याचा अंदाज बागायतदार शेतकऱ्याला येत असतो. यावर्षी अजुनही अधून-मधून कोकणात पाऊस पडत असल्याने आंबा हंगाम महिना-दिड महिना तरी लांबण्याची शक्यता आजच्या घडीला तरी निर्माण झाली आहे. कोकणच्या किनारपट्टीला गेले काही दिवसांमध्ये मुसळधार पाऊस, वादळी पाऊस असं समिश्र वातावरण तयार झालं आहे. सहाजिकच याचा एक विचित्र परिणाम या आंबा बागायतींवर होत आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात सर्वसाधारणपणे मोहोर येतो. यावर्षी मोहोर आलाच नाही. थंडीही गायब आहे. आता जरी पाऊस थांबला तरीही भरपूर मोहोर येण्यास डिसेंबर महिना उजाडणार आहे. यामुळे सहाजिकच यावर्षीचा प्रथमचा आंबा बाजारात यायला मार्च महिना उजाडणार आहे. त्यामुळे कोकणातील हा हापूस आंबा देशभरातील बाजारात मोठ्याप्रमाणावर दिसायला निश्चितच एप्रिल-मे महिना उजाडण्याची शक्यता आहे. कोकणातील आंबा बागायतदाराने गेल्याकाही वर्षात केवळ मुंबईच्या मार्केटवरच अवलंबून न रहाता आंबा बागायतदार स्वत:ची एक वेगळी आंबा विक्री व्यवस्था निर्माण केली आहे. काही आंबा बागायतदारांना पुणे, कोल्हापूरमध्ये थेट ग्राहकांच्या घरांपर्यंत जात आंबा विक्री करताना दिसतात. कोरोनानंतर थेट आंबा विक्रीच्या या नव्या विक्री व्यवस्थेने आंबा बागायतदारांना आपल्या आंबा पेटीला कीती दर घ्यायचा, आंबा विक्री कशी करायची याची एक विक्री व्यवस्थाच तयार झाली आहे. जरी या विक्री व्यवस्थेत आंबा बागायतदाराला अधिकचे कष्ट पडत असले तरीही आंब्याला चांगला दर निश्चितच मिळू लागला आहे. यावर्षी आंबा हंगाम उशिरा असला तरीही बागायतदार शेतकऱ्याला चांगले दिवस येतील अशी अपेक्षा ठेवायला काहीच हरकत नाही.












