कोकणचे नेते आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायणराव राणे यांचे लांजा तालुक्यात आणि शहरात काही काळ विश्रांती घेण्याचे आणि चहा पिण्याचे हक्काचे ठिकाण म्हणजे कोत्रे रेस्टॉरंट होय. अगदी मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक असल्यापासून ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतरही नारायणराव राणे लांजात आल्यानंतर कोत्रे रेस्टॉरंटच्या चहाचा आस्वाद घेतल्यानंतरच पुढे मार्गस्थ होत असत. इतके घरोब्याचे संबंध निर्माण झाले होते. कोत्रे रेस्टॉरंट आणि कोत्रे उद्योग समुहाचे मालक शिवाजी कोत्रे यांनी राणेसाहेबांविषयीच्या आपल्या आठवणींना उजाळा दिला.
लांजातील एक यशस्वी हॉटेल व्यवसायिक अशी ओळख असलेल्या कोत्रे रेस्टॉरंट चे मालक शिवाजी कोत्रे यांनी कोकणचे नेते, खासदार नारायणराव राणे यांच्या विषयी बोलताना म्हणाले की, माजी मुख्यमंत्री, कोकणचे नेते नारायणराव राणे अर्थात दादा राणे यांच्याशी आपली ओळख ही हन १९८२ पासूनची आहे. त्यावेळी दादा हे मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून कार्यरत होते. ते ज्या ज्या वेळी सिंधुदुर्ग इथून मुंबईकडे जात असत त्यावेळी ते हमखासपणे आपल्या हॉटेलला भेट देत असत. यावेळी त्यांच्यासोबत माननीय नीलम वहिनी या देखील असायच्या. तसेच त्यांचे परममित्र हनुमंत परब व अन्य सहकारी असायचे. दादा, कोत्रे हॉटेलला आल्यानंतर या ठिकाणी चहा प्यायल्याशिवाय पुढे जायचे नाहीत. कधी कधी ते रात्री उशिरा यायचे मात्र कोत्रे हॉटेलचा चहा प्यायल्याशिवाय ते पुढे जायचे नाहीत. त्यांच्याशी आपले अतूट आणि जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले होते. आणि हे घरोब्याचे संबंध आजपर्यंत असेच टिकून राहिले आहेत.
नारायणराव राणे हे ज्यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते त्यावेळी त्यांच्या विषयीच्या एका गोड अनुभवाबद्दल बोलताना शिवाजी कोत्रे म्हणाले की, मुख्यमंत्री झाल्यानंतर ते लांजात चहापानासाठी आपल्या कोत्रे रेस्टॉरंट मध्ये थांबले होते. मुख्यमंत्री असल्याने सहाजिकच सुरक्षा रक्षकांचा त्यांच्याभोवती गराडा होता. माननीय दादा राणे कोत्रे हॉटेलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी ते हॉटेल सेफ आहे की नाही या दृष्टीने सिक्युरिटी गार्डने आत मध्ये सर्व गोष्टी योग्य आहे की नाही ते तपासण्याचा प्रयत्न केला असता दादांनी त्यांना तिथेच थांबण्यास सांगितले. हे माझे घर आहे, इथे मी पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे या ठिकाणी सुरक्षेचा प्रश्नच येत नसल्याचे त्यांनी सांगितले. राज्याच्या एका मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे आपल्यावर दाखवलेला तो विश्वास, त्यांच्या प्रेमाने आपण पूर्णपणे त्यावेळी भारावून गेल्याचे शिवाजी कोत्रे म्हणाले.
खासदार नारायणराव राणे साहेब यांच्याबद्दल अशाच एका अनुभवाबद्दल बोलताना शिवाजी कोत्रे म्हणाले की, नारायण राणे हे कोकणात आणि सिंधुदुर्गात दाखल झाले की त्यांच्याभोवती कार्यकर्त्यांचा, लोकांचा नेहमीच गराडा असायचा. त्यांना भेटण्यासाठी लोकांची चढाओढ असायची. अशाच पद्धतीने माननीय दादा एकदा कणकवली रेस्ट हाऊस या ठिकाणी थांबले होते. त्यांना भेटण्यासाठी हजारो लोक त्या ठिकाणी जमले होते. आपण देखील दादांना भेटण्यासाठी कणकवली या ठिकाणी गेलो होतो. मात्र या हजारो लोकांमधून दादांनी आपल्याला बरोबर ओळखले. हजारो लोकांमधून दादांनी मला बोलावून घेतले आणि माझी आस्थेने चौकशी केली.
अशाप्रकारे माणसे जोडण्याचे, माणूस जपण्याचे काम दादांनी केले. त्यामुळेच जिथे दादा जातात तिथे आम्ही त्यांच्या सोबत गेलो आहोत.. त्यांच्या दोन्ही मुलांशी देखील आपले चांगले संबंध आहेत. कोकणचे भाग्यविधाते, माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार नारायणराव राणे साहेब यांच्याशी आपली असलेली जवळीक आणि कौटुंबिक संबंध हे आजपर्यंत कायम राहिले असल्याचे शिवाजी कोत्रे म्हणाले.
माननीय नारायणराव ऊर्फ दादा राणे यांना ७५ व्या वाढदिवसानिमित्त माझ्या भरभरून आणि हार्दिक शुभेच्छा! कोकणच्या विकासासाठी त्यांना परमेश्वर उदंड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
श्री. शिवाजी केशव कोत्रे
कोत्रे रेस्टॉरंट आणि कोत्रे उद्योग समूह













