साळशी हायस्कूलचे मुख्याध्यापक माणिक वंजारे यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

शिरगाव (प्रतिनिधी)      देवगड तालुक्यातील माध्यमिक विद्यामंदिर साळशीचे प्र.मुख्याध्यापक श्री. माणिक वंजारे हे नियत वयोमानानुसार ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त शुभेच्छा व सत्कार समारंभ उत्साही आणि भावूक वातावरणात पार पडला.

माणिक वंजारे यांनी जून १९९१ साली सहाय्यक शिक्षक म्हणून साळशी हायस्कूलमध्ये रुजू होऊन शिक्षकी सेवेला प्रारंभ केला. २०१९ पासून त्यांनी प्रभारी मुख्याध्यापक पदाची जबाबदारी सांभाळली. ३४ वर्षांच्या सेवेनंतर ते सेवानिवृत्त झाले.

या प्रसंगी आयोजित सत्कार समारंभात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माणिक वंजारे यांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, भेट वस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या पत्नी सौ. समिधा वंजारे यांनाही भेटवस्तु देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त करत सरांच्या कार्याचा गौरव केला आणि भेट वस्तू देऊन आपुलकी व्यक्त केली. सरपंच वैशाली सुतार, संस्था अध्यक्ष सत्यवान सावंत, चेअरमन सत्यवान भोगले, शिक्षणप्रेमी किशोर लाड, प्रभाकर साळसकर, वैभव साळसकर आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

सन्मानानंतर माणिक वंजारे यांनी ३४ वर्षांच्या शैक्षणिक प्रवासातील आठवणींना उजाळा देताना सहकाऱ्यांप्रती, संस्थेबद्दल आणि विद्यार्थ्यांबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली.

या कार्यक्रमाला वरील उपस्थित मान्यवरासह, संस्था पदाधिकारी, केंद्र शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश झाडे, विजय सुतार, माध्यमिक विद्यामंदिर साळशीचे मुख्याध्यापक संजय मराठे, सहशिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ तसेच वंजारे यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील भरणकर यांनी केले.