तुळस येथे रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद : ३६ रक्तदात्यांकडून रक्तदान..

वेंगुर्ले : प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रक्ततुटवड्याच्या पार्श्वभूमीवर वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग – तुळस आणि भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने तुळस येथे आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ३६ जणांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजसेवेत मौल्यवान योगदान दिले.

सदर शिबिर श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय, तुळस येथे, तुळस श्री देव जैतिराश्रीत संस्थेच्या बहुउद्देशीय सभागृहात यशस्वीरीत्या पार पडले. जिल्ह्यातील रक्तपेढ्यांना आवश्यक रक्तसाठा उपलब्ध करून देणे आणि ग्रामीण भागात रक्तदानाविषयी जागरूकता वाढवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. विशेष म्हणजे प्रतिष्ठानचे हे सलग ३४ वे रक्तदान शिबिर होते.

शिबिराचे उद्घाटन भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ, वेंगुर्ला चे अध्यक्ष प्रा. डॉ. आनंद बांदेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर, भंडारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रमण वायगणकर, ग्रा.प. सदस्य जयवंत तुळसकर, सामाजिक कार्यकर्ते नीलेश नागवेकर, सुजाता पडवळ तालुका उपाध्यक्ष ॲड. श्याम गोडकर व उपाध्यक्ष गजानन गोलतकर यांच्यासह संचालक रमेश नार्वेकर, विकास वैद्य, राजेंद्र कांबळी, सदानंद केरकर, दीपक कोचरेकर, श्रेया मांजरेकर आणि सदगुरू सावंत, सर्पमित्र महेश राऊळ, किरण राऊळ, सागर सावंत, माधव तुळसकर,प्रमोद तांबोसकर, रोहित गडेकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

अहोऱात्र रक्तदान कार्यात योगदान देणाऱ्या सर्पमित्र महेश राऊळ यांचा भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ, वेंगुर्ला यांच्या वतीने शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. प्रा. डॉ. आनंद बांदेकर यांनी बोलताना “रक्तदान ही मानवसेवेची सर्वोच्च कृती आहे. एक थेंब रक्त अनेकांचे जीवन वाचवू शकते. तरुणांनी पुढाकार घेतल्यास रक्ततुटवडा भूतकाळात जाईल.”

रमण वायगणकर यांनी सांगितले,

“भंडारी समाज नेहमीच जनहिताच्या उपक्रमात अग्रेसर राहिला आहे. वेताळ प्रतिष्ठान चे कार्य कौतुकास्पद आहे.”

ॲड. श्याम गोडकर म्हणाले,

“रक्तदानामुळे समाजात सकारात्मकता आणि संवेदना जागृत होते. अशा शिबिरांतून नवीन पिढीला प्रेरणा मिळते.” सर्व रक्तदात्यांचे रोप आणि प्रमाणपत्र देऊन ऋण व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सचिन परुळकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. जी. पी. धुरी यांनी व्यक्त केले