‘कोकण विजय’ नौकाभ्रमण मोहिमेचं विजयदुर्गमध्ये जल्लोषात स्वागत 

 

कोकण किनारपट्टीवरून १० दिवसांची भ्रमंती 

   किनारी पर्यावरण आणि जागरूकतेचा संदेश 

      विजयदुर्ग (प्रतिनिधी) : महाराष्ट्र एन.सी.सी. नेव्हल युनिटच्या वतीने कोकण विजय सागरी नौकाभ्रमण मोहीम शुक्रवारी विजयदुर्ग बंदरात दाखल झाली. दरम्यान, विजयदुर्ग येथे मुक्काम करून काल सकाळी ८ वाजता सरपंच रियाज काझी यांच्या हस्ते रत्नागिरी येथे परतीच्या प्रवासासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी माजी उपसरपंच महेश बिड्ये, विनायक चोडणेकर उपस्थित होते.

‘स्वच्छ, सुंदर, समृद्ध कोकण’ या संकल्पनेवर आधारित रत्नागिरी ते विजयदुर्ग आणि विजयदुर्ग ते रत्नागिरी अशा ३ शिडाच्या होड्याद्वारे ही नौकाभ्रमण मोहीम आयोजित करण्यात आली आहे. १० दिवसांमध्ये ६० नेव्हल कॅडेट्स निसर्गरम्य कोकण किनारपट्टीवरून १२७ नॉटिकल मैल सागरातून नौका भ्रमण करताना रत्नागिरी, रनपार, आंबोळगड, पूर्णगड आणि विजयदुर्ग या महत्त्वाच्या किनारी ठिकाणांवर या मोहिमेतील सहभागी व्यक्तींचा मुक्काम आहे. या प्रवासाद्वारे कॅडेट्सना प्रत्यक्ष दिशादर्शन, किनारी भूगोल व समुद्री कार्यपद्धतीचा अनुभव मिळणार आहे.

या मोहिमेत वेस्टर्न नेव्हल कमांड, मुंबई तसेच भारतीय तटरक्षक दल यांचे तांत्रिक कार्यकारी आणि सुरक्षा सहाय्य मिळणार आहे. कमांडिंग ऑफिसर कमांडर रामाजुल दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम आयोजित केली आहे. त्या मोहिमेत २ नेव्हल अधिकारी, २ ए. एनओएनसीसी अधिकारी, १० नेव्हल स्टाफ, २ शैक्षणिक स्टाफ, २ मेडिकल स्टाफ, २ सिव्हिल स्टाफ आणि ८ राज्य शासकीय कर्मचारी सहभागी झाले आहेत.

 

चौकट

‘कोकण विजय’ ही मोहीम कॅडेट्समध्ये समुद्री कौशल्य, संघभावना, शिस्त, साहसी वृत्ती आणि किनारी पर्यावरण, जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने राबविण्यात आली आहे. तसेच स्वच्छ, सुंदर आणि समृद्ध कोकण या संदेशाला बळकटीत देत कोकणच्या सागरी वारसाकडेही लक्ष वेधण्याचा या उपक्रमाचा हेतू आहे. मुक्कामाच्या ठिकाणी असलेल्या हायस्कूलमध्ये विद्यार्थी, शिक्षक तसेच सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांना हा संदेश देण्यात येत असल्याचे यावेळी कमांडो ऑफिसर रामाजुल दीक्षित यांनी सांगितलं.