वेंगुर्ला-सावंतवाडी रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात ग्रामस्थांचा ‘रस्ता रोको’चा इशारा! 

वेंगुर्ले । प्रतिनिधी : वेंगुर्ले तालुक्यातील तुळस-सावंतवाडी मार्गावरील साईड पट्ट्यांचे काम अपूर्ण असल्याने, तसेच गटारांवरील अतिक्रमणे आणि रस्त्यावरील खड्डे यामुळे शाळकरी मुले व ग्रामस्थांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या तुळस येथील ग्रामस्थांनी येत्या १५ दिवसांत काम पूर्ण न झाल्यास रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे.

याबाबत सामाजिक कार्यकर्ते अवधूत गजानन मराठे यांनी उप अभियंता कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, वेंगुर्ला यांना दिलेल्या सविस्तर निवेदनानुसार, सावंतवाडी-तुळस-वेंगुर्ला मार्गावर साईड पट्ट्यांचे काम अर्धवट आहे. साईड पट्ट्यांअभावी पादचारी, विशेषतः शाळेत जाणारी मुले आणि ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून रस्त्यावरून चालावे लागते. तसेच, काही दुकान व्यवसाय मालकांनी साईट पट्ट्यांवर आणि गटारांवर अतिक्रमण करून गटारीचे पाणी थेट रस्त्यावर सोडले आहे, ज्यामुळे रस्ता निसरडा होऊन अपघाताची शक्यता बळावली आहे.

रस्त्यांवरील गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारलेले नाहीत, त्यामुळे ते रात्रीच्या वेळी दिसत नाहीत. याचबरोबर जैतिर बसस्थानक रस्त्यावरील गतिरोधक जास्त उंचीचे असल्याने त्यांची उंची कमी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तुळस वेशीवाडी ते कुंभारटेंब दरम्यान असलेल्या पुलाला मोठे खड्डे पडले असून, यामुळेही अपघात होण्याची दाट शक्यता आहे. श्री. मराठे यांनी निवेदनात स्पष्टपणे नमूद केले आहे की, शाळेतील मुलांना अपघात झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागच पूर्णपणे जबाबदार राहील, असे म्हटले आहे.

तसेच ज्या दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे, ते अद्याप हटवले गेले नाही. तसेच, गटारांचे अर्धवट राहिलेले काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे, अर्धवट गटारांचे काम आणि अतिक्रमणे हटवण्याचे काम निवेदनाची प्रत मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत पूर्ण करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

दरम्यान, १५ दिवसांत काम पूर्ण न झाल्यास रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. तसेच, सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणत्याही दबावाखाली येऊन साईड पट्ट्यांचे काम अर्धवट ठेवू नये, अशी कळकळीची विनंतीही करण्यात आली आहे. या गंभीर समस्येवर सार्वजनिक बांधकाम विभाग काय कार्यवाही करते, याकडे आता तुळस आणि परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.