सावर्डे: चिपळूण तालुक्यातील सावर्डे पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना पोलिसांनी एका संशयास्पद दुचाकीस्वाराला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडील दुचाकीच्या कागदपत्रांबाबत समाधानकारक उत्तर न मिळाल्याने, सदर दुचाकी चोरीची किंवा गैरमार्गाने मिळवलेली असल्याच्या संशयावरून पोलिसांनी ती जप्त केली आहे.
२३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७:०० वाजण्याच्या सुमारास मौजे आबिटगाव येथे सावर्डे पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल गगनेश चंद्रकांत पटेकर आणि त्यांचे पथक पेट्रोलिंग करत होते. यावेळी त्यांना एक इसम काळ्या रंगाच्या बजाज डिस्कवर दुचाकीसह (क्रमांक MH-08-P-0431) संशयास्पदरीत्या फिरताना आढळला. पोलिसांनी त्याला थांबवून विचारपूस केली असता, त्याने आपले नाव खलील रमजान खान (वय ३६, रा. तेलीवाडी, वहाळ, ता. चिपळूण) असल्याचे सांगितले.
पोलिसांनी संशयित खलील खान याच्याकडे दुचाकीच्या मालकीहक्काबाबत आणि कागदपत्रांबाबत विचारणा केली. मात्र, त्याला त्याबाबत कोणतीही समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. तसेच ती दुचाकी स्वतःच्या मालकीची असल्याचे तो सिद्ध करू शकला नाही. यामुळे ही दुचाकी चोरीची असावी, असा प्राथमिक संशय पोलिसांना आला.
या प्रकरणी पोलिसांनी सुमारे ७,००० रुपये किमतीची जुनी वापरती बजाज डिस्कवर दुचाकी जप्त केली आहे. आरोपी खलील खान याच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२४ अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ४१/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावर्डे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून ही दुचाकी नेमकी कोणाची आहे, याचा शोध घेतला जात आहे.












