बांबू लागवड अनुदानासह विविध विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा
राजापूर : राजापूर तालुका बांबू शेतकरी ग्रुपची तिसरी मासिक बैठक नुकतीच पार पडली. पळसखडी येथील चंद्रशेखर मोरे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत बांबू उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
बांबू शेतकरी सुहास मोरे यांनी माहिती देताना सांगितले या बैठकीतील निर्णयांचा तपशील दिला. बैठकीतील ठळक मुद्दे आणि मागणीचे काही निर्णय झाले आहेत. ‘माणगा’ बांबू कंद तसेच स्थानिक जातीच्या (बोरबेट, माना, मेस) बांबू लागवडीसाठी शासनाकडून विशेष करून २०० रुपये अनुदान मिळावे, यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे ठरले. यासाठी संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची भेट घेऊन पाठपुरावा करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
तसेच आतापर्यंत पारंपारिक पद्धतीने लागवड होत होती, परंतु आता व्यावसायिक लागवड वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ उत्पादक न राहता ‘विक्रेता’ व्हावे, यासाठी चर्चा झाली. ‘बांबू डेपो’ची संकल्पना रुजवण्यासाठी शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन एक चळवळ उभी करण्याचे निश्चित करण्यात आले.
सध्या बांबूचा ठराविक भागच व्यापाऱ्यांना विकला जातो. मात्र, बांबूच्या उर्वरित भागाचाही (शेंड्याकडील भाग) योग्य वापर करून शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढवता येईल, यावर भर देण्यात आला. ६, ८, १० आणि १२ फुटी काठ्यांचे मार्केटिंग करण्याबाबत बांबू डेपो धारक आणि अभ्यासकांशी चर्चा करण्याचे ठरले. बांबू तोडणीसाठी मजुरांची समस्या भेडसावत असल्याने, आधुनिक मशिनरीचा वापर करून तोडणी करता येईल का, याचा अभ्यास करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीला माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन नारकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच वासुदेव घाग, राजन साळवी, ओझर सरपंच विकास रेगे, अब्दुल गनी लांजेकर, संदीप सरखोत, दयानंद चौगुले, सुकांत अहिरे, सुरेश अहिरे, शिवाजी मोरे, प्रतीक लाड, नागेश बने, घनश्याम मोरे, सुधाकर गुरव, शेखर मोरे, अनिकेत मोरे, सुहास मोरे आणि संजय बने हे शेतकरी उपस्थित होते.










