सचिव पदी ललिता जाधव : वेंगुर्ला टीचर फोरम ची घोषणा : कार्यकारिणी जाहीर
वेंगुर्ले l प्रतिनिधी :एस. आर. दळवी (I) फाऊंडेशनच्या वेंगुर्ला तालुका नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, संस्थेच्या संस्थापक श्री. रामचंद्र दळवी आणि सौ. सीता दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राज्याध्यक्ष श्री. महेश सावंत, जिल्हाध्यक्ष श्री चेतन बोडेकर तसेच जिल्हा कार्यकारणी सदस्य श्री.प्रसाद गावडे यांच्या प्रयत्नातून वेंगुर्ला येथील शिक्षक श्री. प्रसाद जाधव यांची तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी (सदस्यत्व विकास) श्री. शालिक पाटील व उपाध्यक्ष (कार्यक्रम) पदावर श्रीम.रामा पोळजी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वेंगुर्ला तालुकाच्या सचिवपदी श्रीम. ललिता जाधव तर सहसचिवपदी श्री. विश्वनाथ जगताप यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे श्री. रवी थोरात आणि श्रीम. रेश्मा वरसकर यांची सल्लागारपदी निवड झाली आहे. एस. आर. दळवी फाऊंडेशन या संस्थेमार्फत सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.
संस्थेचे वेंगुर्ला तालुका नूतन अध्यक्ष श्री. प्रसाद जाधव यांनी संस्थेविषयी माहिती देताना सांगितले की, एस. आर. दळवी (I) फाऊंडेशन ही संस्था शिक्षक सक्षमीकरण व पर्यावरण संवर्धन हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून स्थापन करण्यात आलेली संस्था आहे. शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारा कोणीही व्यक्ती मग तो अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक किंवा उच्च शिक्षण या कोणत्याही गटातील असला तरी तो संस्थेच्या उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतो. ही संस्था कोणत्याही प्रकारची शिक्षक संघटना नसून शिक्षकाचा व्यावसायिक विकास व्हावा, त्यांना शिक्षण क्षेत्रातील नवनवीन संधी उपलब्ध व्हाव्यात, शिक्षकांमधील सुप्त कलागुणांचे प्रकटीकरण व्हावे, म्हणून विविध स्पर्धा तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारे विविध उपक्रम राबविणारी आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करणारी ही संस्था आहे. संस्थेच्या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन संस्थेला सहकार्य करावे, अशी आशा नूतन तालुकाध्यक्ष प्रसाद जाधव यांनी यावेळी व्यक्त केली.












