‘सागर कवच ०२/२५’ द्वारे ४००० जवानांनी तपासली कोकण किनारपट्टीची सुरक्षा
मुंबई: भारतीय तटरक्षक दलाच्या महाराष्ट्र मुख्यालयाच्या समन्वयाने महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवर आयोजित करण्यात आलेला ‘सागर कवच – ०२/२५’ हा व्यापक सागरी सुरक्षा सराव यशस्वीरित्या पार पडला. १९ आणि २० नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या या दोन दिवशीय सरावाद्वारे विविध सुरक्षा संस्थांनी आपल्यातील समन्वय आणि कार्यक्षमता सिद्ध करत, समुद्रावरून होणारे संभाव्य दहशतवादी हल्ले परतवून लावण्यासाठी आपण सज्ज असल्याचा संदेश दिला आहे.
या महाअभ्यासात भारतीय तटरक्षक दलासह भारतीय नौदल, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG), भारतीय लष्कर, कोस्टल पोलीस, कस्टम्स आणि इतर १३ केंद्रीय व ९ राज्यस्तरीय संस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवला. या सरावासाठी समुद्र, हवा आणि जमिनीवर अचूक समन्वय राखण्यासाठी ४००० हून अधिक कर्मचारी, ८० हून अधिक नौका आणि विमाने तैनात करण्यात आली होती. यामध्ये तटरक्षक दल आणि नौदलाच्या जहाजांसह डॉर्नियर विमाने, चेतक हेलिकॉप्टर्स आणि होवरक्राफ्ट्सचा समावेश होता, ज्यामुळे संपूर्ण किनारपट्टीवर कडेकोट पहारा ठेवण्यात आला.
हा सराव केवळ औपचारिक नसून ‘रिअल टाईम’ परिस्थितीचा सामना करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. यात दहशतवाद्यांनी मासेमारी बोटी किंवा व्यापारी जहाजांचे अपहरण करून त्याद्वारे किनाऱ्यावर उतरणे, ओलीस ठेवण्याची परिस्थिती निर्माण करणे आणि महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले करणे अशा विविध आपत्कालीन प्रसंगांचे हुबेहूब (Simulation) चित्रण करण्यात आले. विशेष म्हणजे, अतिरेक्यांनी महाराष्ट्राच्या राजभवनावर ताबा मिळवल्याच्या परिस्थितीत ‘एनएसजी’ (NSG) कमांडोंनी केलेल्या प्रतिहल्ल्याचा सराव यातील महत्त्वाचा भाग ठरला.
या सरावाचे नियोजन १० ऑक्टोबर २०२५ रोजी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत करण्यात आले होते. सागरी सुरक्षा रचनेतील कच्चे दुवे (Loopholes) शोधणे, विविध एजन्सींमधील संपर्क यंत्रणा तपासणे आणि दहशतवादी कारवायांना तोंड देण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना विकसित करणे, हे या सरावाचे मुख्य उद्दिष्ट होते.
या सरावाच्या माध्यमातून भारतीय तटरक्षक दल आणि नौदलाने भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे.












