कुणकेश्वर येथे जमिनीचा वाद विकोपाला

झाडे तोडल्याच्या कारणावरून वाद • कोयत्याने नाकावर वार • देवगड पोलिसांत गुन्हा दाखल

देवगड : प्रतिनिधी

जमिनीच्या वादाचे पर्यवसान मारहाणीत होऊन कुणकेश्वर वरचीवाडी येथे जयेश रविंद्र कांबळी (३५) यांनी शेजारी राहणारे विलास दत्तात्रय कुलकर्णी (७०) यांच्या घरी जाऊन वाद घालत हातातील कोयता त्यांच्या अंगावर उगारला. या वेळी कोयत्याचा वार नाकावर लागल्याने कुलकर्णी जखमी झाले. त्यांच्या नाकातून रक्तस्राव होऊन दुखापत झाली. ही घटना शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देवगड पोलिसांनी जयेश कांबळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास कुलकर्णी व जयेश कांबळी यांच्या शेजारी शेजारी जमीन असून त्या कारणावरून दोघांमध्ये वाद सुरू होता. विलास कुलकर्णी यांनी आपल्या जागेतील साफसफाई करून काही झाडे तोडली होती. याचा राग धरून शनिवारी दुपारी जयेश कांबळी हातात कोयता घेऊन कुलकर्णी यांच्या घराकडे गेले. त्यावेळी जेवण झाल्यानंतर कुलकर्णी अंगणात बसलेले होते. जयेश यांनी ‘झाडे का तोडली’ असा जाब विचारत त्यांच्या भाऊ मनोज कुलकर्णी यांच्या अंगावर धावून जाऊन कोयता उगारला. मनोज यांनी तत्काळ त्यांचा हात पकडून हल्ला रोखला.

या धक्काबुक्कीवेळी विलास कुलकर्णी आपल्या भावाला सोडवण्यासाठी पुढे गेले असता जयेश यांनी कोयता त्यांच्यावर उगारला. यामध्ये कोयता नाकाला लागून ते जखमी झाले. नाकातून रक्तस्राव झाल्याने त्यांनी देवगड पोलिस स्टेशनला तक्रार दिली.

या तक्रारीवरून पोलिसांनी जयेश रविंद्र कांबळी याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 131 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून तपास महिला पोलिस हे.कॉ. विनीता भुजे करत आहेत.