नगराध्यक्ष पदासह नगरपंचायतीवर बहुमत सिद्ध करण्यासाठी मोठे आव्हान
संतोष कोत्रे
लांजा -: लांजा नगरपंचायतीच्या तिरंगी होणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबरच आता लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवसेनेच्या राजकीय स्थित्यंतरामध्ये शिवसेनेकडे ( शिंदे गटाकडे) जाणारी लांजा ही राज्यातील पहिली नगरपंचायत होती. त्यामुळे पुन्हा एकदा नगरपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आमदार किरण सामंत यांचा
राजकीय कस लागणार आहे. तर गतवेळची गेलेली सत्ता पुन्हा काबिज करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचा प्रयत्न असणार आहे. तर मागील निवडणुकीत तीन नगरसेवक असणाऱ्या भाजपाने यावेळी बंडखोरी करत एकता चलो चा नारा दिला असून अपक्ष उमेदवारी पेश करत ‘ हम किसीसे कम नही’ दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे.
लांजा नगरपंचायत निवडणूक सध्या रंगतदार वळणावर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीत शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या अनेक मातब्बर उमेदवारांना नाकारत महामहायुती मधील आपल्या १५ उमेदवारांपैकी १३ जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी देत आमदार किरण सामंत यांनी भाकरी परतवण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे नगराध्यक्ष पदासाठी देखील इच्छुक असणाऱ्या पक्षातील अनेक मातब्बरांना थांबवत आमदार किरण सामंत यांनी सावली सुनील कुरूप या राजकारणातील क्लीन आणि पूर्णपणे नव्या चेहऱ्यावर विश्वास टाकला आहे. मागील नगरसेवकांबद्दल असलेल्या नाराजीचा फटका या निवडणुकीत उमेदवारांना बसण्याची शक्यता लक्षात घेऊन आमदार किरण सामंत यांनी चाणाक्षपणे नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. आमदार किरण सामंत यांची ही राजकीय खेळी कितपत यशस्वी होणार? हे तीन डिसेंबर रोजी स्पष्ट होईलच, परंतु कोणत्याही परिस्थितीत नगराध्यक्षांसहित नगरपंचायतीवर आपली सत्ता आणण्याच्या दृष्टीने आमदार किरण सामान यांचा प्रयत्न आहे. शिवसेनेच्या सर्व तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते यांना तशा सूचना देखील त्यांनी दिलेल्या आहेत.
शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील उर्फ राजू कुरूप,तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई व सर्व पदाधिकारी, भाजपा तालुकाध्यक्ष शैलेश खामकर व सहकारी यांचीही मोठी जबाबदारी आहे.किंबहुना नगरपंचायतीवर सत्ता आणणे ही आमदारांसाठी प्रतिष्ठेची बाब ठरली आहे. त्यांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वाखालीच ही निवडणूक लढवली जात असल्याने निश्चितच या निवडणुकीला एक राजकीय वलय प्राप्त झाले आहे.
तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात असताना महाविकास आघाडीचे पदाधिकारी यामध्ये ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता कदम, उपजिल्हा संघटक रवींद्र डोळस, राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद, तालुका अध्यक्ष राजेश राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राजकीय स्थित्यंतरामध्ये नगरपंचायतीवरील शिवसेनेची गेलेली सत्ता पुन्हा एकदा आणून (नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आणण्यासाठी ) गेलेले गतवैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी ठाकरे शिवसेनेचा प्रयत्न असणार आहे. त्यांच्या या प्रयत्नांना महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून किती प्रतिसाद मिळतो, यावरच महाविकास आघाडीचे भवितव्य ठरणार आहे .
तर राज्यात आणि केंद्रात हातात हात घालून काम करणाऱ्या शिवसेना भाजपा महा युतीमध्ये लांजात बंडखोरीची लागण झालेली आहे. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष असलेले संजय यादव यांनी आपल्या पत्नीला निवडणूक रिंगणात उतरवले आहे. त्याचप्रमाणे लांजा शहरातील बहुसंख्य भाजपा पदाधिकाऱ्यांनी देखील त्यांना पाठिंबा देत अपक्षपणे उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यामुळे भाजपा पदाधिकाऱ्यांची देखील या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.
. एकूणच ही निवडणूक आमदार किरण सामंत यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहेच. पण त्याचबरोबर महाविकास आघाडीसाठी आपले गेलेले गत वैभव प्राप्त करण्यासाठी आणि बंडाचा झेंडा उभारणारे भाजपाचे नेते संजय यादव यांना आम्हीही काही कमी नाहीत हे दाखवून देण्यासाठी नगरपंचायतीची निवडणूक सर्वार्थाने प्रतिष्ठेची ठरणार आहे.











