शिक्षकांच्या वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणासाठी नावनोंदणी सुरु

जिल्ह्यात एकाच ठिकाणी प्रशिक्षण

गौरव पोंक्षे | माखजन :
महाराष्ट्र राज्यातील शासकीय,स्थानिक स्वराज्य संस्था, सर्व अनुदानित शाळातील,ज्या शिक्षकांची १२ वर्षे सलग अर्हताकारीसेवा पूर्ण झाली आहे व अशांना वरिष्ठ वेतन श्रेणी व ज्या शिक्षकांची सलग २४ वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण झाली आहेत अशा नियमात बसणाऱ्या शिक्षकांना निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी नाव नोंदवण्याची ऑनलाईन प्रक्रिया सुरु झाली आहे.

ही नाव नोंदणी २० एप्रिल ला सुरु झाली असून २९ एप्रिल ला सायंकाळी ६ पर्यंत नोंदणी सुरु राहणार आहे.यामध्ये कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही असे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांच्या १६ एप्रिल परिपत्रकात म्हटले आहे.

हे प्रशिक्षण प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक,अध्यापक विद्यालय अशा गटात होणार आहे.कला व शारीरिक शिक्षण शिक्षकांनी गट दुसरा किंवा तिसरा निवडावा असे सुचित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीने होणार असून,प्रत्येक जिल्ह्यात एका ठिकाणी होणार आहे.पात्र उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करून माहिती व शुल्क भरावे असे परिपत्रकात म्हटले आहे.