रोटरी स्कूलमध्ये ‘आपल्या संविधानाची पंच्याहत्तरी’ कार्यक्रम उत्साहात संपन्न

खेड  – रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल, खेड येथे दिनांक २२ नोव्हेंबर २०२५ रोजी अनुलोम संस्थेच्या वतीने ‘आपल्या संविधानाची पंच्याहत्तरी’ हा विशेष उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षकवर्ग आणि मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाची सुरुवात अनुलोम संस्थेचे उपविभाग जनसेवक मा. मयुरेश पाटणकर आणि भाग जनसेवक वेदांग शितूत यांचे स्वागत करून झाली. रोटरी स्कूलचे चेअरमन मा. बिपीनदादा पाटणे यांच्या शुभहस्ते मान्यवरांना पुस्तक आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
अनुलोम म्हणजे अनुगामी लोकराज्य महाअभियान ही सामाजिक संस्था शासनाच्या विविध योजना समाजातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत आहे. मुख्य प्रवाहापासून वंचित राहिलेल्या घटकांना जोडणे, सकारात्मक विचारांचे संवर्धन करणे आणि देशहितकारक समाज निर्मितीसाठी प्रयत्न करणे हे संस्थेचे उद्दिष्ट असल्याचे या कार्यक्रमात स्पष्ट झाले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख वक्ते मा. मयुरेश पाटणकर यांनी भारतीय संविधानाची निर्मिती, त्यामागील ऐतिहासिक घटना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मोलाचे योगदान याची सविस्तर माहिती दिली. संविधानाची निर्मिती प्रक्रिया त्यांनी विद्यार्थ्यांना चित्रफितीच्या माध्यमातून समजावून सांगितली, ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्या काळातील निर्णायक घडामोडींचा जवळून परिचय झाला. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या भारतीय लोकतंत्राच्या चार आधारस्तंभांवर त्यांनी विशेष भर दिला. भारत हा सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक देश असल्याचे मूल्यांद्वारे पटवून दिले. नागरिकत्वाचे प्रकार, मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्वे, कर्तव्ये तसेच संविधानाची आधारभूत तत्त्वे याविषयी त्यांनी सोप्या आणि प्रभावी पद्धतीने माहिती दिली.
“भारतीय संविधान हा आपल्या प्रत्येकासाठी आस्थेचा विषय आहे. त्याचे भान ठेवून वर्तन आणि कृती केली तरच समाज आणि देश योग्य दिशेने प्रगती करू शकतो,” असा संदेश त्यांनी शेवटी विद्यार्थ्यांना दिला. या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख श्री. राहुल गाडबैल यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सुबक सूत्रसंचालन श्री. विलास गावडे यांनी केले. रोटरी स्कूलमध्ये ज्ञानवर्धन, मूल्य शिक्षण आणि संविधान जनजागृती यांचा संगम घडवणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला.