रोटरी स्कूलमध्ये ‘विद्यार्थ्यांचे करिअर’ विषयावरील मार्गदर्शन सेमिनार उत्साहात संपन्न

खेड – रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल, खेड येथे दिनांक २१ नोव्हेंबर २०२५ रोजी विद्यार्थ्यांच्या भविष्यातील करिअरविषयक मार्गदर्शनासाठी विशेष सेमिनारचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रख्यात करिअर मार्गदर्शक मा. डॉ. विवेक वडके यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आणि दिशादर्शक मार्गदर्शन केले.
या सेमिनारची सुरुवात रोटरी स्कूलचे चेअरमन माननीय बिपिनदादा पाटणे यांच्या शुभहस्ते मान्यवरांचे स्वागत-सत्कार करून झाली. या वेळी मा. डॉ. विवेक वडके, मा. निखिल गावंड आणि मा. नितीन दिवते यांचा शाल, श्रीफळ, पुस्तक व भेटवस्तू देऊन यथोचित गौरव करण्यात आला. मार्गदर्शन सत्रात बोलताना डॉ. विवेक वडके यांनी विद्यार्थ्यांसमोर उपलब्ध असलेल्या विविध करिअर मार्गांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी विशेषतः सैन्यदलातील करिअरची संधी सांगताना विद्यार्थ्यांनी देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगावे, असे आवाहन केले. “छत्रपती शिवरायांची ही भूमी; येथे वाढलेल्या प्रत्येक तरुणाने मातृभूमीचे ऋण फेडण्याचे ध्येय ठेवणे हे आपले कर्तव्य आहे,” असे ते म्हणाले. सैन्यातील सेवा ही पवित्र व गौरवशाली असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
करिअर निवडताना विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांचा अभ्यास करून, योग्य माहितीच्या आधारे निर्णय घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली. कोणत्याही क्षेत्रात मेहनत, सातत्य आणि प्रामाणिकता असेल तर यश शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. “दिलेला शब्द पाळणे आणि प्रत्येकाच्या विश्वासाला उतरून काम करणे अत्यंत महत्त्वाचे आहे,” असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. शालेय जीवनातील खेळ आणि व्यायामाचे महत्त्व स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, शारीरिक तंदुरुस्तीचा थेट परिणाम अभ्यासावर होतो. विज्ञान विषयाचा अभ्यास करताना ‘का?’ हा प्रश्न विचारण्याची वृत्ती निर्माण झाली तर विज्ञान शिकणे अधिक सोपे आणि सखोल होते, यावर त्यांनी भर दिला. सेमिनारच्या शेवटी विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधत त्यांनी त्यांच्या शंकांचे निरसन केले आणि भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल आणि उच्च माध्यमिक विभाग प्रमुख प्रा. राहुल गाडबैल यांची उपस्थिती लाभली. सेमिनारच्या अखेरीस डॉ. विवेक वडके यांना रोटरी स्कूलचे चेअरमन मा. बिपिनदादा पाटणे यांच्या हस्ते आभारपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुबक आणि प्रभावी सूत्रसंचालन प्रा. सरिता भारती मॅडम यांनी केले.
करिअरविषयक उपयुक्त मार्गदर्शनाने हा सेमिनार विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरला.