ज्या राजघराण्याने दूरदृष्टीने शहर वसवून सर्व सुविधा पुरविल्या त्या ऋणातून उतराई होण्याची वेळ
जनता पेटून उठल्यावर काय होते ते दाखवून द्या
श्रद्धाराजेंच्या व्हिजनमधील अत्याधुनिक सावंतवाडी शहर घडवणार
आ. दीपक केसरकर यांचा आम्हालाच पाठिंबा असल्याचा दावा
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी नगर परिषदेची ही निवडणूक सावंतवाडीच्या अस्मितेची, प्रतिष्ठेची व स्वाभिमानाची निवडणूक आहे. सावंतवाडी शहराशी राजघराण्याचं अतुट नातं आहे. शहराला खरी ओळख राजघराण्यान दिली आहे. संस्थान काळात येथील नागरीकांची गरज ओळखून रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्याचा विचार राजघराण्यानं केला. दुरदृष्टी ठेवून चांगल शहर निर्माण करण्यासाठी नियोजन केलं आहे. मुलभूत गरजा भागविण्यासाठी त्यांनी निरपेक्ष भावनेने विचार केला. तेव्हा हा विचार केला नसता तर आज ही परिस्थिती असती का हा प्रश्न आहे. त्यामुळे आज राजघराण्याच्या त्या योगदानाची परतफेड करण्याची वेळ आहे. त्यामुळे श्रद्धाराजे भोसलेंसह भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांना आशीर्वाद द्या या शहराचा श्रद्धाराजेंच्या व्हिजनमधील विकास करण्याची जबाबदारी मी घेतो, अशी ग्वाही राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.
सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ येथील गांधी चौक येथे आयोजित भारतीय जनता पार्टीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. श्रद्धाराजे भोंसले, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोसले, विशाल परब, शहर अध्यक्ष तथा उमेदवार सुधीर आडीवरेकर, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेवक ॲड. परिमल नाईक, उदय नाईक, आनंद नेवगी, मनोज नाईक, राजू बेग, ॲड. अनिल निरवडेकर,
ॲड. ऋजूल पाटणकर, गोपाळ नाईक, प्रतिक बांदेकर, मोहिनी मडगांवकर, वेदिका परब, अमित गवंडळकर, दीपाली भालेकर, मेघा डुबळे, समृद्धी विर्नोडकर, ॲड. संजू शिरोडकर, दादू कविटकर, संध्या तेरसे, निलम नाईक, सुकन्या टोपले, सुनिता पेडणेकर, दुलारी रांगणेकर, महेशर शेख, वीणा जाधव यांच्यासह पदाधिकारी आदी उपस्थित होते.
ते म्हणाले, या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी उभे राहण्याची इच्छा जेव्हा राजघराण्याने आमच्याकडे व्यक्त केली तेव्हा कोणताही विचार न करता आम्ही त्यांना नगराध्यक्षपदासाठी संधी दिली. खरतरं राजघराण्याचे या शहरा प्रति असलेले योगदान पाहता सगळ्याच राजकीय पक्षांकडून सावंतवाडीकर म्हणून विचार होईल अशी अपेक्षा होती. समोरून कोणी अर्ज दाखल करता नये होता त्यांनी श्रद्धा राजेंना बिनशर्त पाठिंबा देणे अपेक्षित होते मात्र असे झाले नसले तरीही सावंतवाडीकर जनता मात्र राजा घराण्याच्या स्नुषा असलेल्या श्रद्धाराजे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
आज प्रतिस्पर्ध्यांची वक्तव्य ऐकून आश्चर्य वाटत आहे. राजघराण संपलं हा शब्द वापरला जातोय. मात्र या पूर्वी स्वतः च्या निवडणुकांमध्ये मदत व आशीर्वाद मागताना हा शब्द आठवला नाही का तेव्हा का ताठ भुमिका घेतली असा सवाल मंत्री राणेंनी केला. ते म्हणाले, राजकारण २ डिसेंबर पर्यंत आहे. मात्र, हेच घराणं इथे पिढ्यान पिढ्या असणार आहे. राजघराणं आपला स्वाभिमान, अस्मिता आहे. आपल्या घरात माता-भगिनी आहेत याचाही विचार केला पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
ते म्हणाले, खरं तरं आपल्याला आ. दीपक केसरकर यांचं आश्चर्य वाटलं. ते राजघराणं म्हणून श्रद्धाराजेंना पाठींबा देतील अस वाटल होतं. मात्र, राजघराण्याच्या आशीर्वादाशिवाय न बोलणारे केसरकर आता का बोलले नाहीत ? पाठिंबा का दिला नाही असा सवाल त्यांनी केला. मात्र असं असलं तरीही व राजकारण म्हणून जरी त्यांनी उमेदवार उभा केला असला तरीही आ. केसरकर यांचा पाठिंबा श्रद्धाराजेंनाच आहे, असा दावा त्यांनी केला. श्रद्धाराजेंना मत म्हणजे दीपक केसरकरांना मत आहे. ये अंदर की बात है, दीपक केसरकर हमारे साथ आहे. रविंद्र चव्हाणं यांनी बोलावलं असतं तर कदाचित आज व्यासपीठावर देखील दिसले असते. त्यामुळे ही निवडणूक राजकारणाची नाही, परतफेड करण्याची आहे. पुढच्या पिढीला माणूसकी शिकवण्याची ही निवडणूक आहे. राजघराण्यासह उभं राहण्याची ही निवडणूक आहे, असेही ते म्हणाले.
युवराज्ञींचं व्हिजन शहर विकासाच आहे. भाजपच्या माध्यमातून त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. तुम्ही फक्त भाजपला आशीर्वाद द्या. पालकमंत्री मी आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. भरघोस निधी सावंतवाडी शहराला देऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
काल कणकवलीच्या निवडणूकीच्या सभेत मंत्री उदय सामंत म्हणाले आम्हाला निवडून द्या आम्ही निधीसाठी पालकमंत्र्यांकडे जाऊ. मात्र जर पालकमंत्र्यांकडेच यायचे असेल तर बायपास पेक्षा थेट पालकमंत्र्यांच्या सहकाऱ्यांनाच मतदान करा. थेट निधी मिळेल कारण निधीच्या चाव्या माझ्या खिशात आहेत. आचारसंहिता असल्याने काढू शकत नाही. पण, पुढे माझ्याकडे त्या माझ्याकडेच असणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सावंतवाडीतील आरोग्याची समस्या मोठी आहे. मल्टीस्पेशालिटीबाबत नंतर निर्णय होईल मात्र तोपर्यंत उपजिल्हा रुग्णालयात स्पेशालिस्ट असे पर्मंनंट डॉक्टर व आवश्यक असलेली सर्व अत्याधुनिक मशिनरी उपलब्ध करून देतो. जेणेकरून येथील रुग्णांना गोवा बांबोळीला जायची गरज भासणार नाही असा शब्द त्यांनी दिला. मल्टीस्पेशालिटीवर चर्चेतून मार्ग काढला जाईल कारण स्थानिक डॉक्टरांचीही चिंता आहे. त्यामुळे योग्य विचार करून त्यातून मार्ग काढला जाईल आता राजघराणे आमच्या सोबतच असल्याने जमिनीचा प्रश्न निर्माण होणार नाही असेही ते म्हणाले.
ज्यांना सावंतवाडीची अस्मिता आहे तसेच आय लव्ह सावंतवाडी म्हणणाऱ्यांनी राजघराण्याच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांना जनता पेटून उठल्यावर काय होत ते दाखवून द्या. केवळ श्रद्धा राजे यांनाच नाही तर
तिनदा कमळ बटन दाबून त्यांच्यासह भारतीय जनता पार्टीचं सगळं पॅनेल निवडून द्या, तुमच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी मी घेतो,अशी ग्वाही त्यांनी सरते शेवटी दिली.












