सावंतवाडीकरांनी सून म्हणूनच नाही तर बहिण व मुलगी म्हणून स्वीकारलं
सावंतवाडी : भारतीय जनता पार्टीने सावंतवाडीतून निवडणूक लढण्याची संधी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, युवराज लखमराजे भोंसले यांचे आशीर्वाद मला आहेत. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सावंतवाडीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला असून त्यांनी केवळ सून म्हणूनच नाही तर बहीण व मुलगी म्हणून मला स्वीकारले आहे त्यामुळे माझ्यासह माझ्या सर्व सहकाऱ्यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास भाजपच्या नगराध्यक्षपदासाठीच्या उमेदवार श्रद्धाराजे भोंसले यांनी व्यक्त केले.
त्या म्हणाल्या, येथील जनता मला आशीर्वाद देत आहे. तीच माझी ताकद आहे. सावंतवाडीच्या विकासाचं व्हिजन आम्ही घेऊन जात आहोत. राजेसाहेब रघुनाथ महाराज यांनी शहराच्या ड्रेनेज सिस्टीमच नियोजन केलं होतं. आता पुढील काळात हा वारसा पुढे नेताना नगराध्यक्ष म्हणून टाऊन प्लॅनिंग, रोजगार, आरोग्य, पर्यटन, मनोरंजन सुविधा वाढवण्यासाठी माझा भर राहिल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
माझं शिक्षण हॉटेल मॅनेजमेंट, बिझनेस मॅनेजमेंट मध्ये झालय. त्यामुळे येथील रोजगार वाढवण्यासाठी माझा भर राहणार आहे. महिला, युवकांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी माझे प्रयत्न राहतील. येथील लाकडी खेळण्यांच्या उत्पादनांसह इतर उत्पादनांनाही जागतिक बाजारपेठेत स्थान देण्यासाठी माझा भर असेल, असं मत त्यांनी व्यक्त केले.
मी सावंतवाडीची सुन असल्याचा अभिमान आहे. राजघराण्याचा वारसा मी पुढे घेऊन जात आहे. सावंतवाडीची मुलगी, सुन म्हणून मला लोकांनी स्वीकारलं आहे. राजकारणात मी नवीन आहे. पण, विकसीत सावंतवाडी माझी जिद्द आहे. भाजपच्या आशीर्वादाने पाच वर्षांत सावंतवाडीचा कायापालट करून दाखवणार तुम्ही माझ्यासह आमच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.












