सत्ता भाजप कडे द्या : शंभर टक्के विकासाची जवाबदारी
वेंगुर्ले येथील भाजपच्या प्रचार सभेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद
वेंगुर्ले : दाजी नाईक
वेंगुर्ले नगरपरिषद आदर्श नगरपरिषद म्हणून ओळखले जाते. २०१६ च्या निवडणुकीत येथील नागरिकांनी भाजपाला संधी दिली आणि आम्ही त्या संधीचे सोनं करून दाखवलं. २२ पेक्षा जास्त महत्वाची विकास कामे मार्गी लावली. म्हणूनच पुन्हा सांगतो सद्या केंद्रामध्ये नरेंद्र मोदी तर राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार आहे .केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी एक विचार धारेचे सरकार असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेवर भाजपाची सत्ता आली तर नगरपरिषदची विकासकामे शंभर टक्के पूर्ण करण्याची जवाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून सिंधुदुर्गातील नगरपरिषदा विकास कामासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दत्तक घेणार असल्याची ग्वाही भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी वेंगुर्ला येथील प्रचार सभेत बोलताना दिली.
वेंगुर्ला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दिलीप गिरप, तसेच २० नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आज (२५नोव्हेंबर ) वेंगुर्ला – माणिक चौक येथे आयोजित करण्यात आली होती. या सभेस मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, युवा नेते विशाल परब, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगांवकर, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, वेंगुर्ला भाजपा तालुकाध्यक्ष विष्णू (पप्पू) परब, माजी सभापती निलेश सामंत, महिला तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ, शरद चव्हाण तसेच जिल्हा व तालुका पदाधिकारी, मोर्चा व आघाडीचे पदाधिकारी, शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, सरपंच- उपसरपंच व भाजपा कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रवींद्र चव्हाण पुढे म्हणाले की, वेंगुर्ल्याच्या नागरिकांची सेवा करण्यासाठी निवडणुकीत सेवा व्रत घेऊन भाजप चे उमेदवार उभे आहेत. येणाऱ्या काळात भयमुक्त ठेवणं गरजेच आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या सर्वांशी आम्ही जोडले गेलो आहोत. या शहराला एक चांगल्या पद्धतीने ठेवण्याचे काम सुद्धा या सर्व मंडळींनी सातत्याने केला त्यामुळे तुम्ही सर्वजण येणाऱ्या दोन तारखेला होणारी ही निवडणूक ही तुमचं आणि वेंगुर्ला मध्ये असणाऱ्या सर्व तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी ही निवडणूक आहे. सर्वांच्या भविष्यासाठी भाजपाने उभे केलेल्या उमेदवारांच्या हातात सत्ता द्या, विकासाची जबाबदारी आमची असेही त्यांनी सांगितलं.












