न्हावेली – श्रेयस गावडे
पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार टाळण्यासाठी मळगाव (ता. सावंतवाडी) येथील ग्रामस्थांनी महावितरण प्रशासनाला जागे केले आहे. वीज वाहिन्यांवरील झाडांची छाटणी आणि धोकादायक वीज खांब बदलण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने महावितरणचे उपकार्यकारी अभियंता शैलेश राक्षे यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन दिले.
मळगाव परिसरात दरवर्षी पावसाळ्यात झाडांच्या फांद्या वीजवाहिन्यांवर पडून वीजपुरवठा तासनतास खंडित होतो. तसेच अनेक भागांत वीज खांब जीर्ण झाल्याने अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय, गावात कमी दाबाने (Low Voltage) वीजपुरवठा होत असल्यामुळे घरगुती उपकरणांचे नुकसान होत असल्याची तक्रारही ग्रामस्थांनी केली आहे.
या निवेदनाची दखल घेत अभियंता शैलेश राक्षे यांनी, पावसाळा सुरू होण्यापूर्वी मुख्य वीज वाहिनीला अडथळा ठरणारी झाडी तोडण्याचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच लो-व्होल्टेजच्या समस्येबाबत वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवून तांत्रिक उपाययोजना करण्याचे मान्य केले.
यावेळी मळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते गुरु गावकर, नितेश तेली, सिद्धेश आजगावकर, रुपेश खडपकर, गणेश खडपकर, देवेन खडपकर, नितिन गावडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास पावसाळ्यात होणाऱ्या त्रासाला जबाबदार कोण? असा प्रश्नही यावेळी ग्रामस्थांनी उपस्थित केला.












