मसुरे | झुंजार पेडणेकर
नव्या शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी आणि नवप्रविष्ठ विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी, आज दिनांक गुरुवारी पळसंब शाळा नं. १ येथे ‘शाळा पूर्व तयारी मेळावा’ मोठ्या उत्साहात पार पडला. प्राथमिक शिक्षणाची पहिली पायरी चढणाऱ्या चिमुकल्यांचे स्वागत करण्यासाठी शाळेचा परिसर सजवण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे उद्घाटन पळसंब गावचे सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सौ. स्मिता जुवेकर, शाळेचे मुख्याध्यापक श्री. विनोद कदम, शिक्षिका सौ. सोनगडे व सौ. गव्हाणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच अंगणवाडी सेविका कु. निकिता पुजारे, श्रीमती सावंत, श्रीमती पळसंबकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षक आणि पालक उपस्थित होते.
मेळाव्या दरम्यान शाळेत दाखल होणाऱ्या मुलांच्या शारीरिक, बौद्धिक आणि सामाजिक विकासाची पाहणी करण्यासाठी विविध ‘स्टॉल्स’ लावण्यात आले होते.
मुलांची ओळख, रंग ज्ञान आणि साध्या कृतींद्वारे त्यांची क्षमता तपासण्यात आली.
मुलांचा गृहपाठ घेण्यापेक्षा त्यांच्याशी संवाद कसा साधावा, याबाबत शिक्षकांनी पालकांना मार्गदर्शन केले. अंगणवाडी सेविकांनी मुलांच्या पूर्वतयारीचा आढावा घेत त्यांना शालेय वातावरणाशी जुळवून घेण्यास मदत केली.
यावेळी बोलताना सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर म्हणाले की, “शाळा ही गावाचे भूषण आहे. मुलांच्या शैक्षणिक पाया भक्कम करण्यासाठी पालकांनी जागरूक राहणे गरजेचे आहे.” तर मुख्याध्यापक श्री. विनोद कदम यांनी शाळेमार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली आणि गुणवत्तेसाठी कटिबद्ध असल्याचे ग्वाही दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद, अंगणवाडी कर्मचारी आणि पालकांनी विशेष परिश्रम घेतले. मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पालकांचा उत्साह यामुळे या मेळाव्याने आगामी शैक्षणिक वर्षाची सकारात्मक सुरुवात केली आहे.











