नाचणे येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या गोडाउनला लागली भीषण आग

लाखोंच्या एचडीपी पाईप जळून भस्मसात

रत्नागिरी : प्रतिनिधी
शहरानजीकच्या नाचणे येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या गोडाउनला रविवारी सकाळी अचानकपणे आग लागून लाखोंच्या एचडीपी पाईप जळून भस्मसात झाल्या. वाऱ्यामुळे गोडावून तसेच आजुबाजुच्या जागेतील वाळलेल्या गवतामुळे ही आग परसत गेल्यामुळे गोडावूनच्या परिसरात ठेवण्यात आलेल्या पाईप जळून खाक झाल्या. तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर नगर परिषद आण्ाि एमआयडीसीच्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले.

रविवार 30 नोव्हेंबर रोजी सकाळी नाचणे परिसरातील हवामान केंद्रासमोरील मोकळ्या जागेत असलेल्या जीवन प्राधिकरणाच्या गोडाउन आणि बाजुच्या जागेत सुकलेल्या गवताला अचानकपणे आग लागली. वाऱ्यामुळे आग पसरत गेल्याने आगीने तेथील गोडावूनला आपल्या विळख्यात घेतले. या गोडावूनच्या आवारात पाणी पुरवठा योजनांसाठी वापरण्यात येणारे मोठमोठे एचडीपी पाईप्स ठेवण्यात आले होत. हे पाईप ज्वलनशील असल्याने आगीने रौद्ररुप धारण केले. त्यामुळे गोडावून मधून धुराचे लोट बाहेर येताना दिल्याने नागरिकांनी याबाबत नगर परिषद आणि एमआयडीसीच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले.