गगनबावडा येथील डी. वाय.पाटील कारखाना देणार 3500 रु. ऊसदर

आ.सतेज पाटील यांची माहिती

वैभववाडी l प्रतिनिधी :      गगनबावडा आसळज येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखाना चालू हंगामात गळीतास येणा-या ऊसास एकूण प्रतिटन 3500 रुपये ऊसदर देणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी दिली. कारखाना पहिल्या उचलीपोटी प्रतिटन 3450 रुपये देणार असून 50 रुपयांप्रमाणे दुसरा हप्ता आदा करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

ते पुढे म्हणाले, “कारखान्याने चालू गळीत हंगामात 2 डिसेंबर अखेर 1 लाख 28 हजार 320 मे. टन ऊसाचे गाळप करुन 1 लाख 7 हजार 800 क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केलेले आहे. कारखान्याने हंगाम सुरुवातीपासून ते 15 नोव्‍हेंबर 2025 अखेर कारखान्याकडे गळीतास आलेल्‍या 48 हजार 278 मे. टन ऊसाच्‍या बिलापोटी प्रतिटन 3400 रुपयांप्रमाणे 16 कोटी 41 लाख 46 हजार एवढी रक्‍कम सोमवारी संबंधीत शेतक-यांच्या बँक खाती जमा केली असून उर्वरित प्रतिटन 50 रुपयाप्रमाणे होणारी रक्कम 24 लाख 14 हजार बुधवारी वर्ग केली आहे.

“कारखान्याने एफ.आर.पी.पेक्षा जादा दर देण्याची भूमिका कायम ठेवली आहे. चालू वर्षी कारखान्याने 5.00 लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट असून गळीत हंगाम सन 2025-26 साठी शेतक-यांनी पिकविलेला संपूर्ण ऊस गळीतास पाठवून कारखान्‍याने ठरविलेले गाळप उद्दिष्‍ट साध्‍य करण्‍यासाठी सहकार्य करण्‍याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी कारखान्याचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक जयदिप पाटील, सेक्रेटरी नंदू पाटील व खातेप्रमुख उपस्थित होते.