वैभववाडी l प्रतिनिधी : परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांची तपोभूमी म्हणून ओळखल्या जाणा-या गगनगडावर गुरुवारी दि.४ डिसेंबर रोजी किल्ले गगनगडावर दत्त जयंतीचा मुख्य सोहळा संपन्न होणार आहे.
पश्चिम महाराष्ट्र व तळकोकणातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या गगनबावडा येथील मर्द किल्ले गगनगडावरील दत्त जयंती सोहळ्यास वेगळेच महत्त्व असते. दत्त जयंती सोहळ्या निमित्ताने बुधवार दि.३ डिसेंबर ते ६ डिसेंबर असे चार दिवस गगनगडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गगनगड पठारावर दत्त जन्माचा मुख्य सोहळा ४ डिसेंबर रोजी साजरा होणार आहे. गगनगडावर भाविकांची यावेळी गर्दी होते. दरम्यान विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन दत्त जयंती उत्सव समितीचे वतीने गगनगडावर करण्यात आले आहे. यानिमित्ताने गगनगडावरील मंदिरांना रंगरंगोटी करण्यात आली असून गगनगड आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे.
गगनबावडा आगारातून तळकोकणासह कोल्हापूर, आदी मार्गावर जादा गाड्यांचे नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
गगनगडावर भाविक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. दत्तजयंती उत्सवासाठी गगनगड व्यवस्थापन सज्ज झाला असल्याची माहिती व्यवस्थापक रमेश माने, संजय पाटणकर, शांताराम बापू पाटणकर यांनी दिली.











