सिंधुदुर्ग जिल्ह्यातून १५ शिक्षकांना ‘आयडॉल शिक्षक’ पुरस्काराने गौरव
सावंतवाडी । प्रतिनिधी :
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने यावर्षीपासून प्रथमच सुरू केलेल्या ‘आयडॉल शिक्षक’ (Ideal Teacher) या राज्यस्तरीय उपक्रमासाठी वेंगुर्ला तालुक्यातील कै. रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ नं. १ येथील पदवीधर शिक्षक श्री. गणेश नाईक यांची निवड झाली आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी तसेच शाळा व विद्यार्थी विकासाकरिता आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या राज्यातील उपक्रमशील आणि गुणवंत शिक्षकांना गौरवण्यासाठी शिक्षण विभागाने या पुरस्काराची सुरुवात केली आहे.
श्री. गणेश नाईक यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण १५ शिक्षकांची राज्यस्तरावर ‘आयडॉल शिक्षक’ म्हणून निवड करण्यात आली आहे, ही जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब आहे.
४ डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे कार्यशाळेचे आयोजन
या ‘आयडॉल शिक्षकांच्या’ कार्याचा गौरव व सन्मान करण्यासोबतच त्यांच्या अनुभवांचा उपयोग राज्यातील इतर शाळांना, शिक्षकांना, विद्यार्थ्यांना आणि पालकांना व्हावा, या उद्देशाने एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, ४ डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथील निराला बाजार येथील तापडिया नाट्यमंदिर येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत राज्यातील सर्व आयडॉल शिक्षकांसाठी या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेतून शिक्षकांना प्रोत्साहित करण्याचाही शासनाचा मानस आहे.
श्री. गणेश नाईक यांच्या या उल्लेखनीय निवडीबद्दल कै. रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ नं. १ च्या शाळा व्यवस्थापन समितीमार्फत त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे. त्यांच्या या निवडीमुळे वेंगुर्ल्याच्या शैक्षणिक क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.












