सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून भाजपतर्फे लढण्याची इच्छा : राजन तेली

लोकसभा व विधानसभेच्या जिल्यातील सर्व जागा कमळ निशाणीवर लढल्या जाव्यात

जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना सर्वांची लाभली साथ

सावंतवाडी । प्रतिनिधी : विधानसभेसाठी १५२ प्लस व लोकसभेसाठी ४५ प्लस असा नारा भाजप नेतृत्वाने दिला आहे. भाजपच्या प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी आपल्यावर देण्यात आली आहे. त्यामुळे लोकसभेचा उमेदवार व सावंतवाडी मतदार संघाचा विधानसभेचा उमेदवार हा कमळ निशाणीवरच मिळाला पाहिजे अशी मागणी आपण केली आहे. तर आपल्याला या ठिकाणी निवडणूक लढवण्याची इच्छा आहे परंतु उमेदवारी देण्याचा निर्णय हा सर्वस्वी पार्टीचा व पार्लमेंट्री बोर्डाचा आहे. त्यामुळे वरिष्ठ जो निर्णय घेतील तोच मान्य असेल, असे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी स्पष्ट केले.
सावंतवाडी येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे जिल्हाप्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा बँक संचालक तथा आंबोली मंडल अध्यक्ष रवींद्र मडगावकर, भाजपचे जिल्हा चिटणीस मनोज नाईक, माजी नगरसेवक आनंद नेवगी आदी उपस्थित होते.
भाजपचा जिल्हाध्यक्ष या नात्याने चार वर्षांपेक्षा जास्त काळ आपण काम केले. जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना मंडळ अध्यक्ष, सरचिटणीस व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते यांचे सहकार्य वेळोवेळी मिळाले. ज्यांनी आपल्याला ही संधी दिली ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील यांचा आपण आभारी आहे, असेही ते म्हणाले.
या चार वर्षांमध्ये अनेक उपक्रम आपल्या माध्यमातून राबवण्यात आले. सगळ्यांना बरोबर घेऊन विविध उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला. याच कार्यकाळामध्ये देशाचे केंद्रीय मंत्री म्हणून नारायण राणे यांना संधी मिळाली तसेच रवींद्र चव्हाण हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. या दोघांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे काम केले. जिल्ह्याचे भाजप मुख्यालय म्हणून येथे कामाला सुरुवात झाली तसेच प्रत्येक तालुक्यामध्ये स्वतःचे भाजपाचे कार्यालय व्हावे यासाठी प्रयत्न केले. आठ तालुक्यांपैकी चार ठिकाणी भाजप कार्यालयासाठी स्वतःच्या जागा घेण्यात आल्या. मोदी@ ९ कार्यक्रमांतर्गत आजपर्यंत विविध कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडले या सर्वांमध्ये पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोलाची साथ लाभली, असे ते म्हणाले.
भाजपचा जिल्हाध्यक्ष म्हणून शत प्रतिशत भाजप करण्याचा प्रयत्न सर्वाच्या माध्यमातून केला. सावंतवाडी मतदारसंघात एकमेव बांद्यासारख्या ठिकाणी भाजपा निवडणूक लढवत असताना आज या ठिकाणी सर्वाधिक जास्त सरपंच भाजपाचे आहेत याचा आपल्याला अभिमान आहे. आता नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झालेल्या प्रभाकर सावंत यांना पुढील वाटचालीस आपल्या शुभेच्छा आहेत. तर मंत्री केसरकर यांनी अलीकडेच परिषदेत आपले आमदारकीचा पुढील वारसदार सांगताना भाजपचे पदाधिकारी युवराज लखम राजे यांचे नाव घेतले. मुळात त्यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे नाव घेणे शोभत नाही कारण त्यांनी आतापर्यंतच्या आपल्या राजकीय वाटचालीमध्ये एकही नेतृत्व तयार केले नाही त्यामुळे आज त्यांच्यावर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची नाव घेण्याची पाळी आली आहे, असा टोला त्यांनी लगावला.

चौकट –

शहरात तुंबत असलेल्या पाण्याबाबत मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा : संजू परब

सावंतवाडी शहरातील गटारांची कामे पावसाळ्यापूर्वी वेळेत पूर्ण न झाल्याने गेले दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसात सावंतवाडी शहरात ठीक ठिकाणी पाणी तुंबले. या संदर्भात माजी नगराध्यक्ष संजू परब यांना विचारले असता आपण चार दिवसांपूर्वीच मुख्याधिकार्‍यांचे यासंदर्भात लक्ष वेधले आहे. त्यांनी सदरची कामे तात्काळ मार्गी लावण्याचा शब्द आपल्याला दिला आहे, असे स्पष्ट केले.

फोटो :
सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना माजी आमदार राजन तेली बाजूला संजू परब, मनोज नाईक, रवींद्र मडगावकर, आनंद नेवगी व अन्य ( सिद्धेश सावंत