खेड : भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या प्रभावी अंमलबजावणीला तांत्रिक बळ देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने रत्नागिरी जिल्ह्यातील खेड विभागाला अत्याधुनिक मोबाइल फॉरेन्सिक व्हॅनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या व्हॅनमुळे भविष्यातील गुन्हे तपासाची गती आणि अचूकता दोन्ही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
दिनांक २९ नोव्हेंबर २०२५ रोजी रत्नागिरी पोलीस मुख्यालयात मा. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या हस्ते या उच्च तंत्रज्ञानयुक्त मोबाइल फॉरेन्सिक व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपअधीक्षक (मुख्य) राधिका फडके, रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांसह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नवीन फॉरेन्सिक व्हॅनमध्ये मोबाइल डेटा विश्लेषण, डिजिटल पुराव्यांची प्रक्रिया, डेटा रिकव्हरी, सायबर गुन्ह्यांचे तपास तंत्र, तसेच पुरावा संकलनासाठी अत्याधुनिक सॉफ्टवेअर आणि उपकरणे बसवण्यात आली आहेत. प्रशिक्षित फॉरेन्सिक तज्ञांची नियुक्ती झाल्यामुळे घटनास्थळीच त्वरित पुरावे तपासण्याची क्षमता मिळणार आहे.
या सुविधेमुळे गुन्हेगारी तपासाची शास्त्रीय पद्धत अधिक मजबूत होणार असून जिल्ह्यातील गुन्हे उकल पूर्वीपेक्षा अधिक वेगाने आणि अचूकतेने होण्यास मोठी मदत मिळणार आहे. खेड विभागासाठी प्रदान केलेली ही व्हॅन पोलीस दलाच्या तांत्रिक बळकटीकरणातील एक महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे.












