नगरपंचायत निवडणुकीत भरभरून मतदान करणाऱ्या नागरिकांचे मानणार आभार
लांजा -: भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष असलेले आणि नगरपंचायत निवडणुकीत लांजा कुवे संघटन चे नेतृत्व करणारे संजय यादव यांच्या आभार दौऱ्याला सोमवारी आठ डिसेंबर पासून प्रारंभ होणार आहे. या दौऱ्यात लांजा आणि कुवे येथील नागरिकांचे ते आभार व्यक्त करणार आहेत.
लांजा नगरपंचायतीची निवडणूक दोन डिसेंबर रोजी पार पडली असून २१ डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या निवडणुकीमध्ये संजय यादव यांनी लांजा कुवे संघटनच्या माध्यमातून अपक्ष उमेदवारांचे स्वतंत्र पॅनेल उभे केले होते. तर नगराध्यक्ष पदासाठी त्यांच्या पत्नी प्रियंका यादव यांना त्यांनी रिंगणात उतरवले होते.
त्याबाबत बोलताना संजय यादव यांनी सांगितले की, या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये लांजा आणि कुवे या दोन्ही गावातील नागरिकांनी,मतदारांनी आपल्याला भरभरून प्रेम दिले. त्यांच्याप्रती आभार व्यक्त करणे हे माझे कर्तव्य आहे. निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबर रोजी असला आणि निकाल काहीही लागला तरी ज्या मतदारांनी आपल्या आपल्याला भरभरून प्रेम केले, अशा मतदारांप्रती प्रेम व्यक्त करणे,त्यांचा आदर व्यक्त करणे, त्यांचे आभार मानणे हे आपले कर्तव्य आहे. म्हणूनच सोमवार दिनांक ८ डिसेंबर पासून आपण लांजा आणि कुवे येथील नागरिकांच्या भेटी घेऊन आभार व्यक्त करणार आहोत. ज्येष्ठ नेते विजय कुरूप, विठोबा गावकर, प्रमोद कुरूप, रवींद्र राणे, अतुल आवळेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली हा आभार दौरा काढणार आहोत.
नगरपंचायत निवडणुकीमध्ये आपण लांजा कुवे संघटनच्या माध्यमातून अपक्षपणे पॅनेल उभे केले होते. तर नगराध्यक्षपदासाठी आपली पत्नी प्रियंका यादव हिला उभे केले होते. निवडणुकी प्रचाराच्या काळात आपल्याला लांजा आणि कुवे या दोन्ही गावातील जनतेने, मतदारांनी भरभरून प्रेम केले. अनेक जुन्या आठवणींना उजाळा देखील दिला. त्यामुळे अशा सर्व मतदारांचे, नागरिकांचे आभार मानणे हे आपले कर्तव्यच आहे. आणि याच कर्तव्यातून आपण दिनांक ८ डिसेंबर पासून आभार दौरा काढणार आहोत. जे प्रेम आपल्याला दोन्ही गावातील नागरिकांनी दिले त्यातून उतराई होण शक्य नाही. परंतु त्यांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन त्यांचे आभार व्यक्त करणे नक्कीच शक्य आहे. हा आभार दौरा त्यासाठी काढणार असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले.










