भक्तिमय वातावरणात श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथे पार पडला संन्यास विधी ग्रहण सोहळा

 आध्यात्मिक उन्नतीचा ठरला अलौकिक क्षण

सावंतवाडी । प्रतिनिधी : श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथे श्री नागेश शास्त्री गुरुजी यांचा दंडी संन्यास ग्रहणविधी झाला. संन्यास ग्रहणानंतर गुरुजींना श्री परमहंस परिवर्जकाचार्य दत्तानंद भारती स्वामी ही उपाधी व नाव देण्यात आले. हा विधी २९ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

अध्यात्मिक व वैदिक परंपरेतील विरळा मानला जाणारा हा सोहळा श्री प. प. दत्तानंद भारती स्वामी यांच्या जीवनातील आध्यात्मिक प्रवासाला वेगळे वळण देणारा होता.

श्री जगद्गुरु शंकराचार्य, श्री सचिदानंद अभिनव विद्या नरसिंह भारती स्वामी (संकेश्रर व करवीर पीठ) यांचे मार्गदर्शन व सानिध्यात गुरुजींनी केलेल्या सेवा, वेद अध्ययन, व धार्मिक कार्य यांचा गौरव त्यांच्या दंडी संन्यास दिक्षेतून झाला.

श्री श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती दत्तात्रय स्वामी महाराजांच्या कृपेने प. प. दत्तानंद भारती स्वामींनी केलेल्या साधना प्रवचन वेदाध्ययन कर्मकांड शास्त्र अध्ययन आणि गुरु सेवा याचा शिखरबिंदू म्हणून हा सोहळा झाला. या सोहळ्यासाठी श्री जगद्गुरु शंकराचार्य श्री सचिदानंद अभिनव विद्या नरसिंह भारती स्वामी (जगद्गुरु शंकराचार्य संस्थान मठ संकेश्वर व करवीर पीठ ), तसेच परमपूज्य दंडी स्वामी शंकर भारती स्वामी यांनी उपस्थित राहून आशीर्वाद दिला.

शनिवारी २९ नोव्हेबर रोजी श्री दत्तप्रभूंना श्रीफळ ठेऊन प्रार्थना, सकाळी ९ ते १२ सर्व प्रायशियत्त होम, कुष्मांड होम, उपवास, रविवारी ३० नोव्हेंबर रोजी अष्ट श्राद्ध, शौर, संन्यास संभार स्थापना, गणपती पूजन, नांदीश्रद्धांत पुण्याहवचन, सावित्री प्रवेश. सोमवारी १ डिसेंबर रोजी विरजा होम, जागरण. मंगळवारी २ डिसेंबर रोजी दंड ग्रहण, अभिषेक, श्रींची महापुजा, मठ भिक्षा असा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक श्री क्षेत्र नरसिंहवाडी दत्त देवस्थान ट्रस्ट, श्री श्रीपाद शास्त्री गुरुजी,श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथील समस्त संन्यासी सेवा तत्पर पुजारी मंडळींच्या सहकार्याने सशास्त्र व विधिवत संन्यास विधी संपन्न झाला. समस्त भक्तगण यांनी देखील मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.