सावंतवाडी: सहकाऱ्यासोबत शिकारीसाठी गेलेल्या वेर्ले येथील सचिन सुभाष मर्गज (वय २८) या युवकाचा शिकारीच्या उद्देशाने झाडलेली गोळी लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली होती. याप्रकरणी मृत युवकाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून सावंतवाडी पोलिसांनी सिप्रीयन ॲन्थॉनी डान्टस (वय ३५, रा. कोलगाव) याला ताब्यात घेतले आहे. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले असता ९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
या घटनेत वापरलेली बंदूक, घटनास्थळावरील छर्रे पोलिसांनी जप्त केले असून, शिकारीसाठी वापरलेली जुपिटर दुचाकीदेखील ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सचिन मर्गज आणि सिप्रीयन डान्टस हे दोघे शुक्रवारी सकाळी जुपिटर दुचाकीवरून ओवळीये येथे शिकारीसाठी गेले होते. सिप्रीयन हा बंदूक घेऊन शिकारीच्या उद्देशाने उभा होता, तर सचिन जंगलात आवाज देण्यासाठी (हाकारा) गेला होता. त्याचवेळी समोरच्या झुडपामध्ये काहीशी हालचाल दिसल्याने सिप्रीयनने त्या दिशेने गोळी झाडली. यावेळी काही लांडोर पक्षी उडून बाजूला गेले आणि त्याच क्षणी ‘आई गं…’ अशी किंचाळी ऐकू आली. सिप्रीयनने धाव घेतली असता सचिन मर्गज रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेला दिसला. त्याच्या तोंडावर व छातीत गोळ्यांचे छर्रे घुसले होते. अतिरक्तस्रावामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी ९.३० ते ११ च्या सुमारास घडली होती.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मृत सचिनचे वडील सुभाष मर्गज यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात याबाबतची फिर्याद दिली. त्यानुसार सिप्रीयन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी त्याला न्यायालयात हजर केले असता ९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेचा अधिक तपास सुरू आहे.













