कालावधी 14 डिसेंबर २०२५ पर्यंत
दापोली :
दापोली येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ आणि भारत मौसम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 10 ते 14 डिसेंबर 2025 या पाच दिवसांच्या कालावधीसाठी रत्नागिरी जिल्ह्याचा कृषी हवामान सल्ला जाहीर करण्यात आला आहे. मिळालेल्या अंदाजानुसार या काळात जिल्ह्यात कमाल तापमान ३३ ते ३४°से तर किमान तापमान १८–२०°से दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५३–५५% तर दुपारची ३०–३३% इतकी अपेक्षित असून हवामान मुख्यतः निर्विघ्न आणि निरभ्र राहण्याचा अंदाज आहे.
कमी तापमानाचा परिणाम – पशुपालन व कुक्कुटपालन करणाऱ्यांना खास सूचना
रात्री गारठा वाढण्याची शक्यता लक्षात घेता प्राण्यांना थंडीपासून संरक्षण देणे अत्यावश्यक आहे. पशुधनासाठी गोठ्यात गुंडाळी, गोणपाटाचे पडदे, तर कुक्कुटपालन शेडमध्ये विजेचे तसेच उबदार तापमान ठेवणारे स्रोत वापरण्याची सूचना तज्ञांनी दिली आहे. नव्या पिल्लांसाठी योग्य ब्रुडर तापमान आणि आहार पद्धतीकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आंबा–काजू बागायतदारांसाठी विशेष इशारा
दमट हवामानामुळे आंबा व काजू बागांमध्ये तुडतुडे, शेंडे पोखरणारी अळी, गॉल माशी आणि करपा रोगाचा धोका वाढू शकतो.
बोंगे फुटण्याच्या अवस्थेत असलेल्या झाडांवर रोग व कीड नियंत्रणासाठी योग्य औषधांची फवारणी, रोगट फांद्या तोडून नष्ट करणे आणि बागेतील साफसफाई करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच काजू उत्पादन वाढवण्यासाठी गोमूत्र + पाण्याची फवारणी आणि 19:19:19 खताचा वापर प्रभावी ठरणार असल्याचेही नमूद केले आहे.
मोहरी, मधुमका, वाल, कुळथ–चवळी, पालभाज्या व टोमॅटो–वांगी रोपे पेरणीसाठी योग्य काळ
मातीतील ओल व तापमान लक्षात घेऊन मोहरी व मधुमक्याचे विरळणी शेतकऱ्यांनी करावी. पालक, माठ, कोथिंबीर, मेथी यांसारख्या भाज्यांच्या बीजप्रक्रियेसह पेरणी सुरू ठेवण्याचा सल्ला, तर टोमॅटो–वांगी रोपे सरी–वरंबा पद्धतीने 60-60 सेमी अंतरावर पुनर्लागवड करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले आहे.












