खेड-दापोली मतदारसंघातील मत्स्य व किनारपट्टी विकासकामांना मिळणार गती

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतली मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची भेट

नागपूर (विशेष प्रतिनिधी)
खेड-दापोली मतदारसंघातील महत्त्वाच्या विकासकामांसाठी आज विधानभवन, नागपूर येथे राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची विशेष भेट घेतली. या भेटीत किनारपट्टी सुरक्षेपासून समुद्र धूप नियंत्रणापर्यंत आणि मच्छिमारांच्या हिताच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर विस्तृत चर्चा करण्यात आली.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रथम अर्थसंकल्प २०२५ मध्ये समुद्र धूप प्रतिबंधक बांधकामांना मंजुरी देण्याची तातडीची गरज मंत्र्यांसमोर मांडली. आंजर्ले (ता. दापोली, जि. रत्नागिरी) येथील दक्षिणेकडील बाजूस ग्रोयान्स टाईप बंधारा उभारणीसह तद्नुषंगिक कामे त्वरित मंजूर करण्याची मागणी त्यांनी केली. या बांधकामांमुळे किनारी भागातील धूप थांबण्यास मदत होणार असून स्थानिक जनतेच्या सुरक्षेलाही मोठा हातभार लागणार आहे.
याशिवाय, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत अत्याधुनिक बोटींसाठी शासकीय अनुदान उपलब्ध व्हावे, तसेच राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC) योजनेंतर्गत बांधलेल्या मच्छिमार नौकांना ५५ टक्के अर्थसहाय्य देण्याबाबतही मागणी करण्यात आली. मच्छिमारांच्या सक्षमीकरणासाठी या निर्णयांची अंमलबजावणी महत्त्वाची असल्याचे पृष्टीसह मांडण्यात आले. या भेटीत मांडण्यात आलेला सर्वात गंभीर मुद्दा म्हणजे एलईडी लाईटच्या साहाय्याने अवैधरित्या मच्छिमारी करणाऱ्या परप्रांतीय फास्टर नौकांची वाढती संख्या. या नौकांमुळे स्थानिक मच्छिमारांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे सांगत, अशा नौकांवर नियंत्रण आणण्यासाठी विशेष स्पीड बोटी उपलब्ध करून देण्याची मागणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केली. या सर्व मागण्यांवर मंत्री नितेश राणे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. विशेषत: परप्रांतीय एलईडी फास्टर नौकांवर कारवाईसाठी आवश्यक स्पीड बोटी उपलब्ध करण्याबाबत येत्या मंगळवारी विशेष बैठक घेण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या पुढाकाराने झालेली ही भेट खेड-दापोली मतदारसंघातील मत्स्य व्यवसाय व किनारपट्टी सुरक्षा मजबूत करण्यासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.