मोबाईल हरवलेला नाही, तर विकलेला
पोलिसांच्या तपासाला मिळाला नवा धागा
कणकवली : मोबाईल हरवल्याचे कारण सांगून थेट आत्महत्येपर्यंत पोहोचणाऱ्या सोहम चिंदरकर (२२, कलमठ कुंभारवाडी) व ईश्वरी राणे (१८, कणकवली-बांधकरवाडी) यांच्याबाबत महत्त्वाचा खुलासा पोलिसांकडे प्राप्त झाला आहे. सोहम याचा मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. सोहमचा मोबाईल हरवला नव्हता तर त्यानेच कणकवलीतील एका विक्रेत्याला विकला होता, अशी बाब पोलीस तपासात पुढे आली आहे. पोलिसांनी शुक्रवारी हा मोबाईल ताब्यात घेतला. त्यामुळे या आत्महत्या प्रकरणाचा उलघडा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
याबाबत वृत्त असे की, ‘माझा मोबाईल हरवला असून त्यामध्ये काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ आहेत. मोबाईल कुणाला सापडला तर माझी बदनामी होईल., असे मेसेज सोहम याने आपल्या आईच्या मोबाईलवरून ईश्वरी हिला केले होते. ईश्वरी हिने समजावूनही सोहम ऐकत नसल्याने अखेरीस दोघांनी तरंदळे धरण गाठून थेट पाण्यात उडी मारून आत्महत्या केली होती. सोहमच्या मोबाईलमध्ये नेमके आक्षेपार्ह काय आहे? असा प्रश्न पोलिसांनाही पडला होता. मोबाईल बंद असल्यामुळे ‘लोकेशन’ही सापडत नव्हते. अखेर पोलिसांनी विविध मार्गांनी तपास करत कणकवली शहरातीलच एका विक्रेत्याकडून हा मोबाईल ताब्यात घेतला. हा मोबाईल सोहम याने आपल्याला विकला होता, अशी माहिती त्या विक्रेत्याने कणकवली पोलिसांना दिली. तो मोबाईल ‘फॉरमॅट’ मारलेल्या स्थितीत असल्याने त्यातील आक्षेपार्ह बाबी समजू शकलेल्या नाहीत. हा मोबाईल सोहम याने स्वतःच फॉरमॅट केला होता का, असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे.
आत्महत्या मागचे नेमके कारण काय ?
सोहमने आईच्या मोबाईलवरुन ईश्वरीला मॅसेज करत तरंदळे धरणावर जाऊयात असे कळविले. त्यानुसारच सोहम आणि ईश्वरी यांनी एकत्रितरित्या तरंदळे धरण परिसरात जावून शेवटचा संवाद केला. त्यानंतर पाण्याने भरलेल्या तुडुंब धरणात दोघांनी उडी मारत आत्महत्या केली, असे तपासात पुढे येत आहे. दरम्यान सोहम याचा हरवलेला मोबाईल सापडला आहे. त्यामुळे सोहम व ईश्वरी यांनी आत्महत्या करत एवढे टोकाचे पाऊल का उचलले? याचे कारण आता स्पष्ट होणार असल्याचे दिसत आहे.










