रायगड जिल्ह्यातील मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी भीषण अपघात झाला. मुंबईहून कोकणाच्या दिशेने भरधाव वेगाने जात असलेल्या एका कारने पुढे चाललेल्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
जखमी व्यक्तीला तातडीने कोलाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना सकाळच्या सुमारास कोलाडजवळील पुई गावाच्या हद्दीत घडली. धडकेनंतर कारचा पुढील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला होता आणि कारमधील एक व्यक्ती वाहनात अडकून पडली होती.
घटनेची माहिती मिळताच सह्याद्री वन्यजीव संरक्षण सोसायटीच्या बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. हायड्रॉलिक कटरच्या साहाय्याने अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढण्यात आले. अपघातग्रस्त कार हुंडई ऑरा असल्याची माहिती मिळाली आहे.
अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अपघाताचे नेमके कारण शोधण्यास सुरुवात केली आहे. भरधाव वेग आणि निष्काळजीपणा हेच या भीषण अपघाताचे प्रमुख कारण असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.












