फोंडाघाट/कुमार नाडकर्णी— फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी संचलित कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले श्रमसंस्कार शिबिर मोठ्या उत्साहात सुरू झाले. शिबिराचे उद्घाटन फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी मा. श्री. चंद्रशेखर लिंग्रस यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.उद्घाटनप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्री. लिंग्रस यांनी श्रमसंस्कार शिबिराचे महत्त्व, उद्दिष्टे व सामाजिक योगदान यावर सविस्तर प्रकाश टाकला. त्यांनी श्रमसंस्कार शिबिराचा थोडक्यात इतिहास सांगून या उपक्रमाची परंपरा अधोरेखित केली. श्रमाच्या माध्यमातून समाजात श्रमप्रतिष्ठा निर्माण होते, युवकांमध्ये शिस्त, स्वयंशिस्त आणि सामाजिक बांधिलकी रुजते, असे त्यांनी नमूद केले.तसेच अशा शिबिरांमुळे सामूहिक श्रमातून एकोप्याची भावना निर्माण होते व समाज अधिक सशक्त बनतो, असे सांगत त्यांनी शिबिरातील सर्व सहभागी स्वयंसेवकांचे कौतुक केले. शिबिरातून मिळणारे अनुभव हे आयुष्यभर उपयोगी पडतात, असे प्रतिपादन करून त्यांनी या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक समितीचे अभिनंदन केले व शिबिरातील सर्व उपक्रमांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी मा. श्री. सुंदर पारकर गुरुजी (अंतर्गत हिशेब तपासणी) यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिबिरातील विविध कामे युवकांनी स्वतः पुढाकार घेऊन जबाबदारीने करावीत, असे आवाहन केले. युवकांच्या सक्रिय सहभागातूनच अशा उपक्रमांचे उद्दिष्ट साध्य होते, असे त्यांनी नमूद केले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे म्हणाले, विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान न देता समाजाशी जोडणारे उपक्रम राबविणे ही काळाची गरज आहे. त्या दृष्टीने हे श्रमसंस्कार शिबिर अत्यंत उपयुक्त आहे. शिबिरात सहभागी सर्व स्वयंसेवकांनी मनापासून काम करून या उपक्रमाचा पुरेपूर लाभ घ्यावा.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक NSS कार्यक्रम अधिकारी प्रा. जगदीश राणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. बाजीराव डाफळे यांनी केले.या उद्घाटनप्रसंगी ब्रह्मनगरी येथील ग्रामस्थ श्री. जयवंत सावंत, श्री. प्रवीण हिंदळेकर, श्री. ज्ञानेश चिंदरकर, डॉ. केंद्रे, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग, NSS चे स्वयंसेवक व स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.












