मनी लाँड्रिंगचा खोटा आरोप, बनावट पोलिस व न्यायालयीन नोटीस
भीती दाखवून ‘RBI मध्ये पैसे जमा’ करण्याचा फसवा बहाणा
पुण्यात डिजिटल अटकेचा बनाव करून सायबर चोरट्यांनी एका प्रख्यात ऑटोमोबाईल कंपनीच्या 80 वर्षीय निवृत्त अधिकाऱ्याची तब्बल 1 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात नाव गुंतल्याचा खोटा दावा, बनावट पोलिस अधिकारी आणि बोगस न्यायालयीन नोटीस यांच्या माध्यमातून वृद्ध नागरिकाला मानसिक दबावाखाली ठेवून ही रक्कम उकळण्यात आली.
पुणे : कसबा पेठेतील रहिवासी असलेल्या एका 80 वर्षीय निवृत्त अधिकाऱ्याला 21 नोव्हेंबर रोजी अज्ञात मोबाईल क्रमांकावरून व्हिडिओ कॉल आला. कॉल करणाऱ्याने स्वतःला नाशिकचा पोलिस निरीक्षक असल्याचे सांगितले. सार्वजनिक क्षेत्रातील बँकेत खाते आहे का, अशी विचारणा करून नकार मिळताच, तुमच्या नावावर बनावट बँक खाते उघडून 2 कोटींचे व्यवहार झाल्याचा खोटा आरोप करण्यात आला.
कॉलरने त्या खात्याचे बोगस बँक स्टेटमेंटही शेअर केले. त्यानंतर पुन्हा व्हिडिओ कॉल करून मनी लाँड्रिंग प्रकरणातील संशयितांच्या यादीत तुमचे नाव असल्याचे सांगितले. या प्रकरणाबाबत घर सोडून इतर कोणाशीही चर्चा करू नका, असा दमही देण्यात आला.
पोलिसांच्या माहितीनुसार, 22 नोव्हेंबर रोजी एका ‘वरिष्ठ अधिकारी’ असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीने संपर्क साधत अटकेचा आदेश जारी झाला असून 90 ते 180 दिवस तुरुंगवास होऊ शकतो, अशी धमकी दिली. तसेच PFI च्या सदस्यांनी मनी लाँड्रिंगसाठी तुमच्या नावावर खाते उघडले, असा बनाव करण्यात आला.
25 नोव्हेंबर रोजी पीडिताच्या नावाने जारी केलेली बोगस न्यायालयीन नोटीस पाठवण्यात आली. त्यानंतर आरोपींनी बँक बॅलन्सची माहिती विचारून ‘RBI मध्ये पैसे जमा करणे आवश्यक’ असल्याचे सांगितले आणि तीन दिवसांत रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले.
28 नोव्हेंबर ते 4 डिसेंबरदरम्यान पीडित अधिकाऱ्याने वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये एकूण 1 कोटी रुपये ट्रान्सफर केले. मात्र 7 डिसेंबरपर्यंत पैसे परत न मिळाल्याने आणि आरोपींचे फोन बंद येऊ लागल्याने फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पुणे सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
तपासात समोर आले आहे की, ही रक्कम गुजरातमधील वडोदरा, आंध्र प्रदेशातील नेल्लोर आणि तामिळनाडूमधील कोईम्बतूर येथील बँक खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आली आहे. सायबर पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
सायबर पोलिसांचे आवाहन: पोलिस किंवा सरकारी यंत्रणा कधीही फोन/व्हिडिओ कॉलद्वारे अटक, चौकशी किंवा RBI मध्ये पैसे जमा करण्यास सांगत नाहीत. अशा कॉल्सना बळी न पडता त्वरित 1930 हेल्पलाईन किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी.











