जिल्ह्यात गुलाल महायुतीचाच : ना. नितेश राणे

महाविकास आघाडी औषधालाही शिल्लक राहणार नाही

विकासाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्रच

सावंतवाडी । प्रतिनिधी :
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील निर्णय हा वरिष्ठ पातळीवरून होत असतो. या निवडणुकांमध्ये जरी स्थानिक पातळीवर आम्ही एकमेकांसमोर लढत असलो तरी या लढती मैत्रीपूर्ण असतात. त्यामुळे जेव्हा जिल्ह्याच्या विकासाचा विषय असतो त्यावेळी आम्ही एकाच व्यासपीठावर असतो. शेवटी महायुती म्हणून आम्ही एकच असून कोकणचा विकास हेच आमचे ध्येय आहे असे स्पष्ट करतानाच उद्या जाहीर होणाऱ्या निकालात विजय हा महायुतीचाच होईल महाविकास आघाडी औषधाला देखील शिल्लक राहणार नाही असा विश्वास राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.

पारपोली येथील फुलपाखरू महोत्सवाच्या उद्घाटनासाठी आलेल्या पालकमंत्री यांनी उपस्थित पत्रकारांची संवाद साधला. फुलपाखरू महोत्सवाच्या माध्यमातून सह्याद्री पट्ट्यातील स्थानिक गावांचे अर्थकारण पूर्णपणे बदलणार आहे. सिंधू रत्न योजनेच्या माध्यमातून आमदार दीपक केसरकर यांनी अशा विविध प्रकल्पांना चालना दिली आहे. माझ्या मतदारसंघातील वैभववाडी येथे साकारण्यात आलेला काचेचा पूल असो किंवा जिल्ह्यातील या योजनेअंतर्गत साकारण्यात आलेले इतर अनेक प्रकल्प जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत. त्यामुळे या माध्यमातून येणाऱ्या पर्यटकांसाठी इतर पायाभूत व मूलभूत सुविधा प्राप्त करून देण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांच्या नेतृत्वात वनविभाग जिल्ह्यात चांगले काम करीत आहे. माकड व बिबट्या यांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करण्यात ते यशस्वी झाले आहेत. मात्र असे असले तरीही हत्तींचा या ठिकाणी असलेला उपद्रव पाहता त्यांचा देखील कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी विशेष प्रयत्न व्हायला हवेत. त्यासाठी तुम्हाला विभागाने सकारात्मक पावले उचलणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी असून त्यांनी याबाबत कडक धोरण अवलंबणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ओमकार हत्ती सध्या उपद्रवी बनला आहे. काही ठिकाणी तो नासधूस करत आहे. त्यामुळे त्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करणे गरजेचे आहे. हा विषय केवळ एका हत्ती पुरताच नसून भविष्यात या गोष्टी टाळण्यासाठी जिल्ह्यात भव्य असे प्राणी संग्रहालय उभारण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. गणेश नाईक यांच्यासारखे जेष्ठ व अभ्यासू मंत्री वनविभागाला लाभले आहेत त्यामुळे त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात काही वर्षातच भव्य असे प्राणी संग्रहालय उभारण्यात येईल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.