वेंगुर्ले न.प.मध्ये कोण होणार नगराध्यक्ष : कोणाची सत्ता : उद्या होणाार निर्णय..

नगराध्यक्ष पदासाठी गिरप व गावडे यांच्या मद्ये लढत…

कोणत्या २० उमेदवारांना मिळणार नगरसेवक पदाची संधी

वेंगुर्ले : दाजी नाईक
वेंगुर्ले नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणुक मंगळवार २ डिसेंबर रोजी उत्स्फूर्त मतदानाने पार पडली. उद्या रविवार २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. यावेळी निवडणूक रिंगणातील सहा पैकी कोण उमेदवार होणार नगराध्यक्ष आणि कोणाची येणार सत्ता याचा निर्णय जाहीर होणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी दिलीप उर्फ राजन गिरप, विलास गावडे आणि नागेश उर्फ पिंटू गावडे यांच्या मद्ये चुरस आहे. तर ८३ पैकी कोणत्या २० उमेदवारांना नगरसेवक म्हणून नागरिकांनी पसंती दिली आहे तेही स्पष्ट होणार आहे. सकाळी १० वाजता वेंगुर्ले तहसील कार्यालयात मतमोजणी साठी सुरुवात होणार असून प्रशासन या प्रक्रियेसाठी सज्ज आहे.

वेंगुर्ले नगरपरिषद निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढविली आहे. त्यामुळे वेंगुर्लेतील नागरिकांनी कोणाला संधी दिली हे मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. एकूण १६ मतदान केंद्रांवर १०११५ पैकी ७५१४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून ७४.२९ टक्के मतदान झाले आहे. एकूणच निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी, सहाय्यक निवडणुक अधिकारी हेमंत किरूळकर यांनी उद्याच्या मतमोजणीसाठीही योग्य नियोजन केले आहे. या नियोजनानुसार मतमोजणी सुरळीतपणे पार पडणार आहे.

मतदानासाठी चार टेबल लावण्यात आली आहेत. चार फेऱ्यांमध्ये पूर्ण मतमोजणी करण्यात येणार आहे. प्रत्येक वेळी चार मतदान केंद्रांची मतमोजणी होणार आहे. त्या त्यावेळी निवडून आलेल्या नगरसेवक उमेदवारांचे नाव जाहीर करण्यात येणार आहे. तर संपूर्ण मतमोजणी झाल्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी विजयी उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात येणार आहे. तसेच कायदा सुव्यवस्था बिघडू नये, शांततेच्या वातावरणात निवडणूक मतमोजणी प्रक्रिया पार पडावी यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनानुसार वेंगुर्लेचे पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.