रत्नागिरी डाक विभागाचे आवाहन
रत्नागिरी: भारतीय डाक विभाग म्हणजेच पोस्ट ऑफिसमार्फत परदेशात पत्रे आणि पार्सल पाठविण्याची सुविधा अत्यंत वाजवी दरात उपलब्ध करून देण्यात आली आहे. खाजगी कुरिअरचा विचार करता पोस्ट ऑफिसचे दर अगदी वाजवी असून सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारे आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अधीक्षक डाकघर श्री. अ.द. सरंगले यांनी केले आहे.
यावर्षी दिवाळीमध्ये परदेशातील आप्तस्वकीयांचे आणि मुलांचे तोंड फराळाने गोड करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून एकूण ४० पार्सल विविध १२ देशांत पाठविण्यात आली. परदेशी शिक्षणाचा खर्च खूप जास्त असल्याने पालक काटकसर करत असतात, मात्र मुलांना घरचा खाऊ मिळावा ही त्यांची इच्छा असते. मोठे दर पाहता अनेकदा ही इच्छा पूर्ण होत नाही, परंतु डाक विभागाने ही सेवा नवीन स्वरूपात सुरू केल्यामुळे आता कमीत कमी खर्चात भेटवस्तू आणि घरगुती साहित्य परदेशात पाठवणे सोपे झाले आहे.
भारत सरकार आता ‘लोकल टू ग्लोबल’ (Local-Global) माध्यमातून छोट्या उद्योजकांना निर्यात करण्यासाठी प्रवृत्त करत आहे. अशा उद्योजकांना निर्यातीसाठी आवश्यक असणारे मार्गदर्शन पोस्ट ऑफिसच्या मार्फत मिळू शकते. यासाठी रत्नागिरी प्रधान डाकघर येथे ‘डाकघर निर्यात केंद्र’ सुरू झाले असून छोट्या उद्योजकांनी याचा फायदा घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
येणाऱ्या ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा तसेच भेटवस्तू सुद्धा नागरिक पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून परदेशात पाठवू शकतात. रत्नागिरी पोस्टल विभागामार्फत ही सुविधा सर्व जनतेसाठी उपलब्ध आहे.












