फोंडाघाट राधाकृष्ण मंदिरामध्ये पुरुषोत्तम मासानिमित्त रोज महाआरती सोहळ्यास प्रारंभ !

 

श्रीदेव राधाकृष्ण ची प्रतिमा — एक आकर्षण !

फोंडाघाट | कुमार नाडकर्णी — बाजारपेठेतील सर्वांचेच आराध्य, श्रीदेव राधाकृष्ण मंदिरात पुरुषोत्तम मासानिमित्त, पवित्र श्रावण अधिक मासाच्या निमित्ताने, संपूर्ण महिनाभर रोज रात्री आठ वाजता महाआरती सोहळ्याचा प्रारंभ उदंड उत्साहात संपन्न झाला. या अधिक मासाचे अन् महाआरतीचे अवचित्य साधून श्री राधाकृष्णाची फोम अक्रलिकने बनवलेली प्रतिमा आणि आकर्षक सजावट- विद्युत रोषणाई , सत्यवान देसाई यांनी लिलया साधल्याने,भाविकांचे आकर्षण ठरत आहे. या उपक्रमात बालगोपाळ मंडळाचे अबालव्वृद्ध आणि खऱ्या अर्थाने कृष्णाचे बाल सवंगडी – छोटे मंडळी आवर्जून उपस्थित होती.

गेली कित्येक वर्षे किंबहुना मंदिराच्या उभारणीपासून अधिक मासात महाआरतीचा उपक्रम राबविला जातो. अध्यात्म बरोबरच नव्या पिढीला हिंदू धर्मातील रूढी- परंपरा त्यांचे महात्म्य यांची जाण होऊन आत्मिक आनंद मिळावा ही या उपक्रमाची भूमिका बाळा पारकर ,संदीप पारकर बाळा वळंजू,इत्यादी सहकाऱ्यांनी विशद केली. महाआरतीनंतर प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या भाविकांकडून विविध प्रकारच्या प्रसादाचे उपस्थितांना वाटप केले जाते. त्यामुळे या उपक्रमातून नवोदित पिढी- युवा पिढी आणि जुने जाणते यांच्या समन्वयातून पुरुषोत्तम मासाचे महत्त्व- महात्म्य आणि पावित्र्य जपले जाते, याचे सर्वत्र कौतुक होत आहे..