तांत्रिक तपासातून पोलिसांना यश
खिडकीतून प्रवेश करत घरातील टाकी फोडली
पुण्यातील वारजे परिसरात घडलेल्या मोठ्या घरफोडी प्रकरणाचा वारजे माळवाडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. एका ६५ वर्षीय महिलेच्या घरातून तब्बल ५२.५० लाख रुपयांची रोकड व सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली होती. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तीन पेंटिंग कामगारांना अटक केली आहे. आरोपींकडून मोठ्या प्रमाणात रोकड आणि सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे.
पुणे : वारजे माळवाडी पोलिसांनी सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत वारजे परिसरातील एका ६५ वर्षीय महिलेच्या घरातून झालेल्या मोठ्या घरफोडीप्रकरणी तीन पेंटिंग कामगारांना अटक केली आहे. या चोरीत २० लाख रुपये रोख आणि ३२.५० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले होते.
पीडित महिलेची शिवणे परिसरात इमारत असून त्यांनी त्यातील चार फ्लॅट भाड्याने दिले आहेत. भाड्याने मिळणारी रक्कम तसेच शेतातून मिळणारी कमाई त्या घरातील टाकीत साठवून ठेवत होत्या. ऑक्टोबर महिन्यात टाकी तपासली असता त्यात रोकड व दागिने असल्याचे दिसून आले होते. मात्र काही दिवसांनी तपासणी केली असता संपूर्ण ऐवज चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
तपासात चोरट्यांनी खिडकीतून घरात प्रवेश केल्याचे उघड झाले. याप्रकरणी पीडित महिलेने १८ डिसेंबर रोजी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
वारजे माळवाडी पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक विश्वजीत कायंगडे यांनी प्रहार डिजिटल ला सांगितले की, सुरुवातीला आरोपींबाबत कोणताही ठोस सुगावा नव्हता. मात्र तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तीन आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अजय फापळ (१९), कैलास फापळ (२५) आणि बालाजी ढगे (२४) अशी आहेत. हे तिघेही सध्या पुण्यात वास्तव्यास असून मूळचे बीड जिल्ह्यातील आहेत. ते रंगकाम करणारे कामगार असून वारजे परिसरातच राहत होते.
पोलिसांनी आरोपींकडून १९.२४ लाख रुपये रोख आणि चोरीचे सोन्याचे दागिने जप्त केले असल्याची माहिती दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे करत आहेत.











