विश्वविक्रमी रांगोळी कलाकार विलास रहाटे वेरवली, लांजा येथील राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेत सर्वप्रथम

देवरूख (प्रतिनिधी)

श्रीराम विद्यालय व तु. पुं. शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय आणि का. रा. कोळवणकर यामाहा ट्रेनिंग स्कूल वेरवली बु.ll, (ता: लांजा, जि. रत्नागिरी) आयोजित श्री. शैलेश रमेश डोळस विद्यानगरी नामकरण सोहळ्यानिमित्त भव्य राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा: २०२५ मध्ये देवरुखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार श्री. विलास विजय रहाटे यांनी प्रथम क्रमांकाचा सन्मान प्राप्त केला.

या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पोट्रेट(व्यक्तिचित्र) हा विषय आयोजकांनी दिला होता. या व्यक्तित्वांमध्ये भारतीय खेळाडू, सीने कलाकार, नाट्य कलाकार, चित्रकार, शास्त्रज्ञ, राष्ट्रपुरुष, प्रसिद्ध राजकारणी व देवी देवता यापैकी एका विषयाची निवड करायची होती. विलास रहाटे यांनी जागतिक दर्जाचे भारतीय शिल्पकार स्व. राम सुतार यांच्या जीवनावर आधारित ३x४ फुट आकारात ही आकर्षक रांगोळी साकारली. ही रांगोळी विलास रहाटे यांनी १२ तासात पूर्ण करून यश प्राप्त केले.

श्री. विलास रहाटे यांनी आपल्या कलाकारीतून ‘भारताचे लोहपुरुष’ सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी हा स्व. राम सुतार यांनी घडविलेल्या जगप्रसिद्ध पुतळ्याची प्रतिकृती आणि स्व. राम सुतार यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या तीन छबी उत्तमरित्या साकारल्या होत्या. श्री. विलास रहाटे यांनी प्राप्त केलेल्या विजेतेपदासाठी आयोजकांनी रोख रक्कम रु.११,०००/-, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविले. विलास यांनी मिळवलेल्या रांगोळी कलेतील सातत्यपूर्ण यशासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून कौतुकांचा वर्षाव होत आहे.