मसुरे | झुंजार पेडणेकर :देवगड तालुक्यातील मुणगे येथील नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या श्री देवी भगवतीचा वार्षिक जत्रोत्सव २ ते ६ जानेवारी या कालावधीत साजरा होणार आहे. जत्रोत्सवाची सांगता ६ जानेवारीला लळिताच्या कार्यक्रमाने होणार आहे. यानिमित्त २ ला सकाळी ११ वाजता देवी भगवतीच्या पाषाणमूर्तीस वस्त्रालंकाराने सजवून पूजाअर्चा, नैवेद्य, नौबती वाजन, देवीची ओटी भरणे व त्यानंतर गावघराचे गाऱ्हाणे, भाविकांना देवीची ओटी भरणे व देवीच्या दर्शनास सुरुवात होणार आहे. त्यानंतर पाच दिवस सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यंत संगीत भजने, ५ वाजता गोंधळी गायन, ६.३० वाजता नौबती वादन, ७ ते रात्री ११ पर्यंत संगीत भजने, ११ ते १२ वाजेपर्यंत पुराण
वाचन, १२ ते १.३० देवीची पालखी, १.३० ते ३ वाजेपर्यंत गोंधळी गायन व त्यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच ६ ला सायंकाळी ६ वाजता नौबती वादन, सायंकाळी ७ ते रात्री १२ पर्यंत संगीत भजने, १२ ते १ पर्यंत पुराण वाचन, १ वाजता पालखी सोहळा, गोंधळी गायन, कीर्तन, पहाटे लळिताचा कार्यक्रम होणार आहे.
यावेळी मशाल पेटवून नवस फेडणे व नवीन नवस बोलणे, गाऱ्हाणी घालण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर जत्रोत्सवाची सांगता होणार आहे.
कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन देवी भगवती देवस्थानचे अध्यक्ष ओंकार पाध्ये, उपाध्यक्ष दिलीप महाजन, सचिव निषाद परुळेकर यांनी केले आहे.













