जलाल राजपूरकर यांनी आत्मपरीक्षण करावे; बेताल वक्तव्यामुळेच निलंबन – तालुकाध्यक्ष संजय जाधव

खेड (प्रतिनिधी) :
जलाल राजपूरकर यांनी केलेले वक्तव्य योग्य की अयोग्य याचे आत्मपरीक्षण त्यांनी स्वतः करणे गरजेचे आहे, असे ठाम मत राष्ट्रवादी काँग्रेसचे खेड तालुकाध्यक्ष संजय जाधव यांनी व्यक्त केले आहे. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांच्याबाबत केलेल्या बेताल आणि अनुचित वक्तव्यामुळेच जलाल राजपूत यांचे पक्षातून निलंबन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या वक्तव्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे खेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीशी संपर्क साधून एकत्रित चर्चा करण्यात आली आणि त्यानंतर सर्वानुमते जलाल राजपुरकर यांच्या निलंबनाचा निर्णय घेण्यात आला, असे संजय जाधव यांनी सांगितले.
निलंबनानंतर जलाल राजपुरकर यांनी आपल्यावर झालेली कारवाई ही बंधू प्रेमापोटी झाल्याचे विधान केले होते. यावर प्रतिक्रिया देताना संजय जाधव म्हणाले की, हे त्यांचे अज्ञान आहे किंवा बाबाजीराव जाधव यांच्याबद्दल काही आकस असल्यामुळे ते असे बोलत असावेत. १९८५ साली मुंबईतून खेडमध्ये आल्यानंतरपासून आम्ही सर्वजण जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची घडी बसवली गेली असून, १९९०–९५ या काळात पक्षाची अवस्था अत्यंत दयनीय असतानाही सर्वांना सोबत घेऊन पक्ष वाचवण्याचे आणि टिकवण्याचे काम करण्यात आले, असे त्यांनी सांगितले.
यानंतरही पक्ष वाढवण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते बाबाजीराव जाधव सातत्याने करत असून राष्ट्रवादीचे नेते अजय बिरवतकर, स. तु. कदम यांच्यासह सर्वांना एकत्र घेऊन पक्ष मजबूत करण्याचे काम सुरू असल्याचे संजय जाधव यांनी स्पष्ट केले. पक्षाची पूर्वीची परिस्थिती आणि आजची स्थिती याची माहिती कदाचित जलाल राजपुरकर यांना नसावी, त्यामुळेच त्यांनी असे वक्तव्य केले असावे, असेही ते म्हणाले.
जलाल राजपुरकर यांचा पूर्वी पक्षाशी कोणताही संबंध नव्हता. ते दुसऱ्या पक्षात होते आणि गेल्या सात ते आठ महिन्यांपूर्वीच मी स्वतः त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून घेतला होता, असे सांगताना संजय जाधव म्हणाले की, तालुकाध्यक्षांना निलंबनाचा अधिकार नाही असे म्हणणे हे त्यांचे अज्ञान दर्शवते. तालुक्यातील संपूर्ण जबाबदारी तालुकाध्यक्षाची असते आणि निर्णय घेण्याचे अधिकारही तालुकाध्यक्षालाच असतात, याचा त्यांनी अभ्यास करावा.
तालुकाध्यक्ष संजय जाधव यांनी स्वतःच्या कामावर प्रश्न उपस्थित केल्याबाबत ते म्हणाले की, मी काम केले नसते तर पक्षाने मला बिनविरोध तालुकाध्यक्ष बनवले नसते. जलाल राजपुरकर हे पक्षाचे कोणतेही पदाधिकारी नसून ते सामान्य कार्यकर्ते आहेत आणि त्यांनाही मीच गेल्या वर्षी पक्षप्रवेश करून दिला होता. त्यामुळे त्यांनी माझ्या कामावर बोलण्याऐवजी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे. ते स्वतः ग्रामपंचायतीची निवडणूक जिंकू शकले नाहीत, तर मी गेली २५ वर्षे ग्रामपंचायतीत निवडून येत आहे, असेही संजय जाधव यांनी स्पष्ट केले.
मी तालुकाध्यक्ष असलो तरी कार्यकर्त्यांचा सन्मान राखणे हे माझे कर्तव्य समजतो. येणाऱ्या प्रत्येकासाठी खुर्ची लावणे असो किंवा त्यांचे म्हणणे ऐकून घेणे असो, हे मी स्वतः करतो. त्यामुळे जलाल राजपुरकर यांनी माझ्यावर टीका करण्याची गरज नाही, त्यांची ती पात्रताही नाही, असा थेट आरोप त्यांनी केला.
खेड नगरपरिषदेच्या निकालाबाबत बोलताना संजय जाधव म्हणाले की, आम्ही ज्या ज्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केले, त्या त्या ठिकाणी जनतेचा पाठिंबा आमच्यासोबत होता. मात्र निकाल धक्कादायक लागला असून काही ठिकाणी ईव्हीएमबाबत संशय निर्माण होत आहे. तरीही पक्षाची एकजूट कायम ठेवून, जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव, नेते अजय बिरवतकर आणि विधानसभा क्षेत्राध्यक्ष स. तु. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे काम अधिक जोमाने करत राहू, तसेच आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये वेगळा आणि सकारात्मक निकाल मिळवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.