वेंगुर्ले येथे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा केला सन्मान
असे काम करा पुढील २५ वर्ष भाजपचीच सत्ता राहील
वेंगुर्ले : दाजी नाईक
आदर्श निवडणूक कशी लढवायची हे वेंगुर्ले ने दाखवून दिले. पक्षाने दिलेला शब्द सर्वांनी तंतोतंत पाळला. त्यामुळे भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता परिवार म्हणून लढला. त्याचे फलित म्हणूनच भाजपला एक हाती सत्ता मिळाली. एकतर्फी सत्ता चांगली तशी वाईट पण असते. त्यामुळे तुम्ही काळजी घ्या. नागरिकांना कामासंदर्भात दिलेले शब्द पूर्ण करा. लोकांना फसवण्याच काम म्हणजे निवडणूक नाही. आता जबाबदारी वाढली. दुसऱ्या टप्प्यात असे काम करा की पुढील २५ वर्ष येथे सत्ता भाजप चीच राहील असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी वेंगुर्ले येथे बोलताना केले. दरम्यान आरोग्याबाबत निवडणूक कालावधीत दिलेला शब्द आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. देशात राज्यात आदर्शवत असलेल्या वेंगुर्ले नगरपालिकेने आता चांगल्या योजना आणि नवीन प्रकल्प आणावेत पक्षाच्या माध्यमातून निधी कमी पडू देणार नाही असेही नितेश राणे यांनी सांगितले.
वेंगुर्ले येथील भाजपा कार्यालयात आज सायंकाळी पालकमंत्री नितेश राणे यांनी वेंगुर्ले नगर परिषदेत निवडून आलेल्या भाजपाच्या नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांच्या सह सर्व नगरसेवकांचा सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, भाजप तालुकाध्यक्ष पपू परब, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, प्रदेश सदस्य राजू राऊळ, साईप्रसाद नाईक, मनवेल फर्नांडिस, नवनिर्वाचित नगराध्यक्ष दिलीप गिरप, नवनिर्वाचित नगरसेवक सुहास गवंडळकर, सुषमा प्रभूखानोलकर, प्रणव वायंगणकर, शितल आंगचेकर, रविंद्र शिरसाट, प्रीतम सावंत, गौरी माईणकर, गौरी मराठे, सुधीर पालयेकर, आकांशा परब, युवराज जाधव, विनय नेरुरकर, रिया केरकर, सदानंद गिरप, सचिन शेटये, काजल कुबल यांच्यासहित भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त उपस्थित होते. यावेळी नितेश राणे यांनी पराभूत झालेल्या श्रेया मयेकर, यशस्वी नाईक आणि प्रसाद गुरव यांचाही गौरव करून त्यांनीही केलेल्या कामाचे कौतुक केले. तुमच्या कामाचा नक्कीच पक्ष विचार करील असेही सांगितले.
यावेळी बोलताना नितेश राणे पुढे म्हणाले की, निवडणूक झाली म्हणजे निवडणूक काम झाले असे होत नाही. आता प्रत्येकाची जबाबदारी वाढली आहे. नागरिकांचे प्रश्न मार्गी लावतानाच घरोघरी पक्षही पोहोचण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. जे लोकप्रतिनिधी पक्षासाठी काम करणार नाही त्यांना निधी द्यायचा की नाही याचा विचारही केला जाईल हे लक्षात ठेवावे. कारण भाजप पक्षामुळे आपण निवडून आलो आहोत हे कोणीही विसरू नये. नगराध्यक्ष नगरसेवक नाव बदलत राहतील मात्र भाजप पक्ष कायम राहील हे लक्षात ठेवा असे सूचनाही त्यांनी केली. जेथे सत्ता असते तेथे लोकसभा विधानसभेमध्ये पक्षाला कमी मत मिळतात ही परिस्थिती यापुढे राहू नये यासाठी तुम्ही प्रयत्न करा. चांगले काम करा पक्ष तुमच्या कायम सोबत राहील असे सांगून पालकमंत्री राणे यांनी सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
वेंगुर्लेचे यश सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे : मनीष दळवी
यावेळी बोलताना मनीष दळवी म्हणाले की, वेंगुर्लेचे यश सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे यश आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली योग्य नियोजन करून प्रत्येकाने आपली निवडणूक म्हणून प्रचार केला. दिवस रात्र सर्वांनी मेहनत घेतली. त्यामुळेच हे यश मिळाले आहे. हे यश टिकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत पक्षालाही वेळ द्यावा असेही त्यांनी सांगितले.
वेंगुर्ले ते किंगमेकर पालकमंत्री नितेश राणे : पपू परब
वेंगुर्ले नगर परिषदेमध्ये मिळवलेले यश हे सर्वांच्या मेहनतचे फळ आहे. या निवडणुकीत पालकमंत्री नितेश राणे यांनी केलेले नियोजन आणि मार्गदर्शन त्यामुळेच मोठे यश मिळाले. म्हणूनच वेंगुर्ल्याच्या विजयाचे खरे किंगमेकर हे पालकमंत्री नितेश राणे हेच आहेत असेही तालुकाध्यक्ष पप्पू परब यांनी आभार व्यक्त करताना आवर्जून सांगून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत असाच चांगला विजय भाजप मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी महिला तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ, मच्छिमार नेते दादा केळुसकर, वसंत तांडेल, वृंदा गवंडळकर, खरेदी विक्री संघ चेअरमन ज्ञानेश्वर केळजी, सरपंच निलेश सामंत, अवि दुतोंडकर, बंड्या पाटील, माजी नगरसेविका श्रेया मयेकर, प्रसाद गुरव, नितीन चव्हाण आदी उपस्थित होते.यावेळी निरीक्षक म्हणून असलेले राजू राऊळ तसेच प्रशांत आपटे यांचा सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसन्ना देसाई तर आभार तालुका अध्यक्ष पप्पू परब यांनी मानले.












