झाराप पत्रादेवी बायपासवर मळगाव येथे दुर्घटना
सावंतवाडी : मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप ते पत्रादेवी बायपासवर सुरू असलेल्या कॉंक्रिटीकरण कामामुळे बंद केलेल्या रस्त्याचा अंदाज न आल्याने खणलेल्या रस्त्यावरून गेल्यामुळे चालकाचा ताबा सुटून डंपर पलटी झाला. या अपघातात डंपर चालक सिद्धेश सखाराम पालकर ( २७, रा. गोवेरी भगतवाडी ता. कुडाळ ) याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास मळगाव येथील बॉक्सेलच्या वरच्या ब्रिजवर हा अपघात झाला.
अपघातानंतर गंभीर जखमी असलेला डंपरचालक सिद्धेश पालकर याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र, त्याला मृत घोषित करण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रमोद पाटील, पोलीस कॉन्स्टेबल महेश जाधव, संजय कोरगावकर, सचिन चव्हाण, मळगाव पोलीस पाटील गीत गावडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अपघातस्थळाचा पंचनामा केला.
महामार्गावर सुरू असलेल्या कॉंक्रिटीकरणाच्या कामामुळे हा रस्ता तात्पुरता बंद करण्यात आला आहे. वेत्ये तिठ्यावर चॉकलेट फॅक्टरीकडे गाड्यांना डायव्हर्शन देण्यात आले आहे.
मात्र, रात्रीच्या वेळी डायव्हर्शन न घेता सरळ जात असताना खणून ठेवलेल्या रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात घडल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे. तसेच त्यापूर्वीही या ठिकाणी दोन ते तीन गाड्यांचा अपघात झाला आहे. यात काही जणांचा मृत्यू देखील झाला आहे.
ठेकेदार कंपनी तसेच महामार्ग प्राधिकरण विभागाकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य खबरदारी न घेतल्यानेच हे अपघात होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. यापुढे तरी ठेकेदार कंपनीने सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घ्यावी अशी मागणी मळगांव सरपंच हनुमंत पेडणेकर तसेच माजी सभापती राजू परब यांनी केली आहे.
दरम्यान, मंगळवारी सकाळी मृत सिद्धेशच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी उपस्थित नातेवाईकांचा आक्रोश मनाला हेलावून टाकणारा होता.










