जमातुल मुस्लिमीन साठे पोट्रिक मोहल्लातर्फे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा भव्य सत्कार

खेड (प्रतिनिधी) – जमातुल मुस्लिमीन साठे पोट्रिक मोहल्ला, खेड यांच्या वतीने खेड नगर परिषदेमध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष तसेच सर्व नगरसेवकांचा भव्य सत्कार समारंभ शहरातील सफा मशीद चौकात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. खेड शहरात अशा प्रकारचा सर्वसमावेशक व सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा सत्कार सोहळा प्रथमच आयोजित करण्यात आल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
या समारंभास नवनिर्वाचित नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवक, जमातुल मुस्लिमीनचे पदाधिकारी, सदस्य तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी जमातुल मुस्लिमीन साठे पोट्रिक मोहल्लाच्या वतीने नवनिर्वाचित प्रतिनिधींचे स्वागत करण्यात आले. यानंतर सर्व नगरसेवक व नगराध्यक्षांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
या वेळी बोलताना नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांनी शहरातील विविध समाजघटकांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. अशा प्रकारचा सत्कार सोहळा आयोजित करून सामाजिक सलोखा आणि एकोप्याचा आदर्श निर्माण केल्याबद्दल त्यांनी जमातुल मुस्लिमीन साठे पोट्रिक मोहल्ला व सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून शहरातील विविध समाजघटकांमध्ये सौहार्द, बंधुता व सहकार्याची भावना अधिक दृढ होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. संपूर्ण कार्यक्रम शांततामय आणि उत्साही वातावरणात पार पडला.