गव्हे ग्रामपंचायतीत ११.५ लाखांचा अपहार; माजी सरपंच, ग्रामसेवकासह चौघांविरोधात गुन्हा दाखल

खेड । प्रतिनिधी – गव्हे ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये २०१५ ते २०२० या कालावधीत १४ व्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये झालेल्या सुमारे ११ लाख ५० हजार रुपयांच्या अपहार प्रकरणी माजी सरपंच, तत्कालीन ग्रामसेवक व इतर दोघांवर दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी मिलिंद सखाराम मंडेकर (वय ४८, रा. गव्हे, गुरववाडी) यांनी न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, दापोली यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १५६(३) नुसार तपासाचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी उदय शिगवण (तत्कालीन ग्रामसेवक), विनया पवार (माजी सरपंच), सायली साळुंखे (माजी ग्रामसेविका) आणि वसंत घरवे (माजी सरपंच) या चौघांवर फसवणूक व अपहाराचे गुन्हे दाखल केले आहेत.

फिर्यादी मंडेकर यांनी माहिती अधिकार कायद्यान्वये मिळवलेल्या माहितीनुसार, ग्रामसभेत मंजूर करण्यात आलेली अनेक विकास कामे प्रत्यक्षात न करता कागदोपत्री पूर्ण झाल्याचे दाखवले गेले. शासनाचा निधी ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा झाल्यानंतर, संबंधितांनी संगनमताने ‘सेल्फ ट्रान्झॅक्शन’द्वारे तो निधी बेकायदेशीरपणे वळवला असल्याचा आरोप आहे.

या प्रकारामुळे गव्हे ग्रामपंचायतीतील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, या गंभीर आर्थिक गैरव्यवहारामुळे दापोली तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस विभाग करत आहे.