शिरगाव हायस्कूलच्या सन १९९५–९६ च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

शाळेच्या नूतनीकरणासाठी १.५१ लाख रुपयाची देणगी

शिरगाव (प्रतिनिधी)   शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सन १९९५–९६ या इयत्ता दहावीच्या बॅचचा स्नेहमेळावा नुकताच रविवारी शाळेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा देत माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या ऋणातून उतराई होण्यासाठी शाळेच्या इमारत नूतनीकरणासाठी १,५१,००० रुपये इतकी भरीव देणगी जाहीर केली.

या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष अरुणभाई कर्ले, कार्याध्यक्ष ॲड. पी. व्ही. साटम, शाळा समितीचे चेअरमन विजयकुमार कदम, मानद अधीक्षक संदीप साटम तसेच संस्था कार्यकारिणी सदस्य हेमंत देसाई, प्रशांत चव्हाण व प्रकाश गोठणकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने शाळेतील आजी-माजी शिक्षकवृंद तसेच उपस्थित मान्यवरांचा स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन यथोचित गौरव करण्यात आला. यावेळी शिक्षकांनी आपल्या माजी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले, तर विद्यार्थ्यांनी आपल्या जडणघडणीत शाळा व शिक्षकांचे योगदान मोलाचे असल्याचे सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे सन १९९५–९६ बॅचच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत शाळेच्या इमारत नूतनीकरणासाठी १,५१,००० रुपयांचा निधी देणगी स्वरूपात संस्थेकडे सुपूर्द केला. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरुणभाई कार्ले व उपस्थित मान्यवरांनी सर्व माजी विद्यार्थ्यांचे कौतुक करून आभार मानले.

हा स्नेहमेळावा अत्यंत आनंदी व भावूक वातावरणात पार पडला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष जंगले, पूनम साटम व नूतन महाडिक या विदयार्थ्यांनी पुढाकार घेत विशेष मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष नाईक यांनी केले.